Maharashtra (Photo Credit : Wikimedia Commons)

देशातील बहुतेक लोक हे मध्यमवर्गीय किंवा त्या खालील श्रेणीत आहेत. आता पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कंझ्युमर इकॉनॉमी (PRICE) च्या देशव्यापी आर्थिक सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, गेल्या वर्षभरात मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये 5 ते 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या वर्गाचा समावेश आहे. पुढील 8 वर्षांत या श्रेणीतील लोकांचे उत्पन्न 46 टक्के आणि 2047 पर्यंत 63 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

प्राइसच्या सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की, राजकीय आणि आर्थिक सुधारणांचे चक्र आणि क्रम असेच सुरू राहिल्यास भारतीयांमधील श्रीमंत मध्यमवर्गाचा वाटा खूप मोठा होणार आहे. प्राइसचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शुक्ला यांनी दावा केला की भारतातील श्रीमंत मध्यमवर्ग झपाट्याने वाढत आहे. आता 43 टक्के लोक 5 लाख ते 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या श्रेणीत येत आहेत. पूर्वी ही संख्या खूपच कमी होती.

या अहवालानुसार महाराष्ट्र हे सर्वात श्रीमंत राज्य म्हणून उदयास आले आहे. राज्यात 6 लाख 40 हजारांहून अधिक लोकांना अतिश्रीमंत म्हणता येईल. 2021 मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. असे उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या दिल्लीत 1 लाख 81 हजार, गुजरातमध्ये 1 लाख 41 हजार, तामिळनाडूमध्ये 1 लाख 37 हजार आणि पंजाबमध्ये 1 लाख 1 हजार आहे. उच्च उत्पन्न क्षेत्रात सुरत आणि नागपूरने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. 1994-95 मध्ये 30 लाख उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या 98 हजार होती, जी 2021 पर्यंत 18 लाखांहून अधिक झाली आहे. (हेही वाचा: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार SC, ST, OBC प्रमाणे निर्वाह भत्ता; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती)

राजेश शुक्ला म्हणाले की, देशात उच्च मध्यमवर्गाची संख्या वाढली आहे. या वर्गाची क्रयशक्ती वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारासाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. प्रत्येक 10 कुटुंबांपैकी एकाकडे कार आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे कार सुविधेला प्राधान्य देत आहेत. या सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, सर्वात खालच्या श्रेणीतील कुटुंबांना कार खरेदी करणे अजूनही परवडत नाही. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख ते 15 लाख दरम्यान आहे, त्यामध्ये 10 पैकी 3 कुटुंबांकडे कार आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 30 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा जवळजवळ प्रत्येक कुटुंबांकडे कार आहे, तर अतिश्रीमंत कुटुंबाकडे सुमारे तीन कार आहेत. त्याचप्रमाणे 2 टक्के लोकांच्या घरी एसी बसवले जात आहेत. या सर्व बाबी चांगले संकेत आहेत.