Raymond Group Penalty Case: रेमंड ग्रुपचे सीएमडी Gautam Singhania यांनी भरला तब्बल 328 कोटी रुपयांचा दंड; संग्रहालयासाठी 142 कार आयात करताना चुकवले होते सीमा शुल्क
Gautam Singhania (संग्रहित संपादित प्रतिमा)

अब्जाधीश गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्या रेमंड ग्रुपने (Raymond Group) 142 कारच्या आयातीवरील कथित कस्टम ड्युटी चुकविल्याचा खटला निकाली काढला आहे. याबाबत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 328 कोटी रुपयांच्या कस्टम ड्युटी चोरीचा आरोप केला होता. आता डीआरआय क्लोजर रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, रेमंड ग्रुपने 328 कोटी रुपये दंड भरून हे प्रकरण मिटवले आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जेके इन्व्हेस्टर्स (बॉम्बे) लिमिटेड, रेमंड ग्रुपच्या युनिटने भरलेल्या रकमेमध्ये 15% दराने लागू व्याज आणि दंड इत्यादींचाही समावेश आहे. याबाबत डीआरआयने गौतम सिंघानियाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

डीआरआयने रेमंड ग्रुपचे सीएमडी गौतम सिंघानिया यांना त्यांच्या ग्रुप कंपन्यांनी कार खरेदी केलेल्या प्रकरणांमध्ये फायदेशीर मालक म्हणून ओळखले होते. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, सोथबीज, बॅरेट-जॅक्सन आणि बोनहॅम्सकडून त्यांनी 138 विंटेज कार आणि चार आर अँड डी वाहने खरेदी केली होती. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, या गाड्यांचे मूल्य कमी करून त्या संयुक्त अरब अमिराती (UAE), हाँगकाँग आणि यूएसमध्ये नोंदणीकृत मध्यस्थ कंपन्यांमार्फत भारतात पाठवण्यात आल्या. यामुळे सरकारी तिजोरीचा 229.72 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. या कार्सच्या आयातीवर लागू असलेले 215.5% सीमा शुल्क चुकवले गेले होते.

याबाबत रेमंड समुहाच्या जेके इन्व्हेस्टर्स (बॉम्बे) चे प्रवक्ते म्हणाले, ‘हे जुने प्रकरण आहे. या प्रकरणामधील पैसे दिले गेले आहेत आणि आता हे प्रकरण बंद झाले आहे.’ या प्रकरणाशी संबंधित रेमंड समूहाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी तिजोरीचे नुकसान नोंदवलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी आहे व भरलेल्या रकमेमध्ये दंड आणि व्याजाचा समावेश आहे. यामध्ये कर चुकवण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. (हेही वाचा: IT Raid On Rajan Vichare: रविंद्र वायकर यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाची धाड)

डीआरआयच्या म्हणण्यानुसार, 2018 ते 2021 दरम्यान वेगवेगळ्या लिलाव घरांमधून खरेदी केलेल्या कार यूएस आणि यूकेमधून थेट भारतात पाठवण्यात आल्या होत्या. साधारण 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या तपासादरम्यान, डीआरआयने जेके हाऊस, सिंघानियाच्या मुंबईतील निवासस्थानासह रेमंड ग्रुपशी संबंधित परिसरांचीही झडती घेतली. एजन्सीने ईमेल आणि चॅटद्वारे खरेदीसाठी दिलेली वास्तविक किंमत शोधली होती. गौतम सिंघानिया यांनी डीआरआयला दिलेल्या निवेदनात कस्टम ड्युटी पेमेंटमध्ये झालेल्या कमतरतेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. गौतम सिंघानिया यांची जेके हाऊस, कुंबला हिल येथे कार संग्रहालय उघडण्याची योजना होती.