IT Raid On Rajan Vichare: रविंद्र वायकर यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाची धाड
Rajan Vichare | Twitter

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आता अगदी उद्यावर आला असताना आज ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांना धक्का बसला आहे. सकाळी आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar)  यांच्या घरी ईडी ची धाड पडली आणि त्यानंतर खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या रडार वर सध्या ठाकरे गटाचे 2 नेते असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. ED Raids MLA Ravindra Waikar's Residence: भुखंड घोटाळ्याप्रकरणी आमदार रविंद्र वायकर यांच्या निवास्थानी ईडीचे छापेमारी .

सकाळी जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केली. त्यानंतर आता राजन विचारे यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी पोहचले आहेत. राजन विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आल्याची माहिती देखील मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आली आहे. ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील आणि ठाण्यातील अजूनही ठिकाणी आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजत आहे. सकाळपासून त्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार आहे. असे ते म्हणाले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेण्यात आला. उद्धव ठाकरेंकडून याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.

राजन विचारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंचे जुने स्नेही, आनंद दिघेंचे शिष्य आहेत. शिवसेनेतील फूटीपूर्वी त्यांनी एकत्र काम केले आहे. विचारे हे  ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा ठाण्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत. याआधी त्यांनी आमदारकी आणि नगरसेवक पद भूषणवलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबत राहिलेल्या शिलेदारांमध्ये राजन विचारे आहेत.