18 वर्षांचा मराठी मुलगा, अर्जुन देशपांडे याच्या स्टार्टअप कंपनीमध्ये रतन टाटा यांची 50 टक्के गुंतवणूक; जाणून घ्या नक्की काय करते ही कंपनी
अर्जुन देशपांडे, रतन टाटा (संग्रहित संपादित प्रतिमा)

अवघ्या 16 व्या वर्षी आपला स्टार्टअप (Startup) सुरु करणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाच्या कंपनीत रतन टाटा  (Ratan Tata) यांनी 50 टक्के गुंतवणूक केली आहे. टाटा समूहाचे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी मुंबईतील अर्जुन देशपांडे (Arjun Deshpande) याच्या, 'जेनेरिक आधार' (Generic Aadhar) या कंपनीत 50 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ही कंपनी बाजारपेठेपेक्षा स्वस्त दराने किरकोळ दुकानदारांना औषधे विकते. जेनेरिक आधारमध्ये फार्मसिस्ट, आयटी अभियंता आणि विपणन व्यावसायिकांसह 55 कर्मचारी आहेत. सध्या कंपनीचे 150-200 कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य आहे.

देशपांडे याच्या म्हणण्यानुसार, बिझनेस टायकून रतन टाटा यांनी त्याचा प्रस्ताव 3 ते 4 महिन्यांपूर्वी ऐकला होता व टाटा यांना यात भागीदार व्हायचे होते. या गोष्टीची औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल. मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि ओडिशामधील सुमारे 30 किरकोळ विक्रेते या कंपनीशी जोडले गेले आहेत आणि नफ्यातील वाटणीचे मॉडेल अवलंबले गेले आहे. देशपांडे याने दोन वर्षांपूर्वी जेनेरिक आधारची सुरुवात केली होती. येथे थेट उत्पादकांकडून जेनेरिक औषधे खरेदी केली जातात आणि ती किरकोळ दुकानदारांना विकतात, यामुळे घाऊक विक्रेत्याचे सुमारे 16 ते 20 टक्के मार्जिन वाचले आहे.

अर्जुनने याबाबत संगितले, ‘एका वर्षाच्या आत आम्ही सर्वसामान्य आधारावर 1,000 फ्रँचाइजी मेडिकल स्टोअर उघडण्याची योजना आखत आहोत. आम्ही आपला व्यवसाय महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत वाढवू इच्छित आहोत.’ एका सर्वेक्षणानुसार, 60% भारतीय बाजारपेठा जास्त किंमतीमुळे योग्य औषध विकत घेऊ शकत नाहीत. मात्र आता अर्जुनच्या या योजनेमुळे हे शक्य होणार आहे. (हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालय आजी-माजी न्यायाधीश, कर्मचारी; राज्यातील जनता, ज्येष्ठ नागरिक, संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधित 314 कोटी रुपयांची रक्कम जमा)

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी वैयक्तिक पातळीवर ही गुंतवणूक केली असून टाटा समूहाशी त्याचा काही संबंध नाही. यापूर्वीही रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युरीफिट, अर्बन लेडर, लेन्सकार्ट आणि लिब्रेट अशा बर्‍याच स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.