संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) उमेदवारीबाबत शिवसेनेने (Shiv Sena) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेला राज्यसभेवर आणखी एक खासदार वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे जर शिवसेनेच्या तिकीटावर लढत असतील तर त्यांना उमेदवारी द्यायला शिवसेना तयार आहे. आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. तो कोणीही असला तरी नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये शिववसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत सर्वपक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे म्हटले होते. संभाजीराजे यांच्या भूमिकेवरुन पाठिमागील काही दिवसांमध्ये जोरदार चर्चा होती.
संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या छताखाली आणून तिकीट देण्याचा प्रयत्न शिवसेनेने सोडून दिला आहे, असा स्पष्ट संदेश संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेना स्वतंत्र उमेदवारच देईल हेसुद्धा आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारासीठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळतो का? तो मिळालाच तर निवडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 42 मतांची संख्या त्यांना जमवता येते का? हे पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम? शिवसेनेची ऑफर नाकारल्याची चर्चा)
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याच प्रयत्न केला होता. भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली. त्यामुळे शिवसेना आणि महाविकासआघाडीने आता त्यांना पाठिंबा द्यावा. छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ भाजपचीच जबाबदारी आहे का? इतर पक्षांनीही ती जबाबदारी घ्यावी, असे फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, शिवसेनेने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, आम्ही अपक्षाला तिकीट देणार नाही. राज्यसभेवर दुसऱ्या जागेसाठी शिवसेना शिवसैनिकच पाठवेल, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी म्हटले की, संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी नक्कीच राज्यसभेसाठी आवश्यक मतांची बेगमी केली असणार, असा आमचा समज होता. पण त्यांच्याकडे तितकी मते नव्हती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. आमचा कोणालाही विरोध नाही. पण आम्हाला आमचेही संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आमचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर मग त्यांना मतं कशीकाय देणार? ते जर शिवसेनेत आले असते तर गोष्ट वेगळी होती. शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे आम्ही एक पाऊल पुढे टाकले होते. त्यांनीही एक पाऊल पुढे टाकायला हवे होते. ही गोष्ट मी माझ्या मनची सांगत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.