Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढविण्यास संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नाकार दिल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात आज (23 मे) रोजी चर्चा होणार होती. या चर्चेसाठी संभाजीराजे हे वर्षा बंगल्यावर जाणार होते. मात्र, त्यांनी शिवसेनेची ऑफर फेटाळून कोल्हापूरला परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. संभाजीराजे यांचे कार्यकर्तेही परत आपापल्या गावी गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावल्याचीही चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी मात्र संभाजीराजे शिवसेनेच्या तिकीटावर लढत असतील तर त्यांना आमचा पाठींबा आहे. आम्ही त्यांना निवडून आणू असे म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे शिष्टमंडळ यांच्यात हॉटेल ट्रायडंट येथे कालच एक भेट जाली. या शिष्टमंडळात अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उदय सामंत यांचा समावेश होता. या भेटीनंतर संबाभाजीराजे यांना मातोश्रीकडून उद्या (म्हणजे आजच) दुपारी बारा वाजता शिवसेना पक्षप्रवेशासाठी बोलावणे होते. त्यावरुन त्यांचा शिवसेना प्रवेश होणार अशी चर्चा होती मात्र या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे संभाजीराजे यांनी दाखवुून दिल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती शिवबंधनात अडकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा घेणार भेट )

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षात प्रवेश करायला या आधीही नकार दिला आहे. त्यामुळे आता संभाजीराजे पुन्हा नव्याने काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. संभाजीराजे हे मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणारुन निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल. याबाबत शिवसेना खासदार संजय राूत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना फोनवरुन ऑफर दिली. मात्र, संभाजीराजे यांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते.

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली असली तरी मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करुन ते निर्णय घेणार असल्याचे समजते. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे 10 जून रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीत शिवसेना राज्यसभेचे तिकीट कोणाला देते आणि संभाजीराजे आपला उमेदवारी अर्ज कसा दाखल करतात याबाबत उत्सुकता आहे.