मुंबई लोकल (Mumbai Local) बंद करण्याचा तसेच, जिल्हा बंदी लावण्याचा तूर्तास तरी कोणताही विचार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. मात्र, असे असले तरी, राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण नाही. नागरिकांनीच आवश्यक ती जबाबदारी घेऊन यंत्रणेला सहकार्य करावे, असे अवाहनही टोपे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात कोरोना स्थितीवर नेहमीच चर्चा होते. दररोज सकाळी सात वाजता दोन्ही नेत्यांमध्ये कोरोनाबाबत विविध विषयांबाबत नेहमी चर्चा होते. आम्ही सांगितलेली माहिती शरद पवार यांनी ऐकून घेतली. त्यांनी आमच्याकडून काय करावे आणि काय करुन नये याबाबत एक नोट मागितली आहे. जी आम्ही सायंकाळपर्यंत त्यांना पाठवू, असे टोपे यांनी म्हटले. दरम्यान, नागरिकांनी लसीकरणास मोठ्या प्रमाणावर सहकार्य करायला पाहिजे. नागरिकांनी लसीकरणही वेळेत करुन घ्यायला हवे, असे राजेश टोपे म्हणाले. (हेही वाचा, Omicron Scare in Maharashtra: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लागू शकतो का पुन्हा लॉकडाऊन? यावर Maharashtra Health Department ने दिली महत्त्वाची माहिती)
रुग्णसंख्या वाढत असली तरी, परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईचा विचार करायचा तर 100% पैकी 25% लोक कोरोना व्हायरस संक्रमित निघत आहेत. असे असले तरी रुग्णालयं आणि आवश्यक यंत्रणा सक्षम आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही तितके नाही. एकूण रुग्णालयांपैकी जवळपास 80% बेड हे रिकामे आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने कोरोना संक्रमण आणि परिस्थिती निर्माण झाली होती. तशी स्थिती सध्यातरी दिसत नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.