Pune Traffic Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोयता गँग (Koyta Gang), हिट अँड रन (Hit and Run) प्रकरण यांसारख्या घटनांमुळे आगोदरच बदनाम झालेले पुणे (Pune News) आता आणखी एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आले आहे. पुणे येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह (Drunk and Drive) कारवाई सुरू असताना ही घटना घडल्याचे समजते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असले तरी, सुसंस्कृत पुण्यात (Pune News) नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे राज्याच्या गृहखात्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फरासखाना वाहतूक पोलीस चौकीसमोरील घटना

संजय फकिरा साळवे (राहणार : पिंपरी चिंचवड, मूळ गाव- जालना) असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस चौकीसमोर रात्री 8 च्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. याच वेळी एका वाहनाने त्या ठिकाणी प्रवेश केला. चौकशी आणि कारवाईचा भाग म्हणून पुणे पोलीस वाहन बाजूला घेऊन तपासणी करत होते. या वेळी वाहनचालक संजय साळवे याने मद्यप्राशन केल्याचे लक्षात आले. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्रश्नांमुळे चिडलेल्या साळवी याने चक्क महिला पाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या सहकारी पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली आणि आरोपी आणि महिला कर्मचारी यांना दूर नेले. परिणामी संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरुनच अटक केले. दरम्यान, विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, Pune News: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात; पोलिसाने एकाला थेट लेग मसाज करायला लावला (Watch Video))

एक्स पोस्ट

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि सरकारच्या गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. हे सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पुणे शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले

पुणे शहर आणि जिल्ह्यातही पाठिमागील काही दिवसांपासून गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: कोयता गँग दहशत पसरवत आहे. शहरातील कोणत्याही चौकात, रस्त्यावर गल्लीमध्ये गुन्हेगारांचे टोळके हातात कोयता घेऊन दाखल होते आणि हातातील शस्त्रांच्या आधारे दहशत माजविण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे शहरातील दुकानदार, व्यवसायिक, पादचारी आणि ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होते. दुसऱ्या बाजूला, हिट अँड रन प्रकरणामुळे ही पुणे शहर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. हे कमी की काय म्हणून हुल्लडबाज तरुण आणि काही गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या शहरामध्ये रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांवर हल्ला करतात. हातातील स्टंब, बँट अथवा इतर धारधार शस्त्रांनी वाहनाच्या काचा, टायर फोडण्याचे हिंसक कृत्य हे लोक करत असतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे पाहायाल मिळते. या प्रकारानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. त्यामुळे पुणे पोलिसांवर सक्त काराईच्या सूचना आणि आदेश राज्य सरकारने दिल्याने कारवाई केली जात आहे. दरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत ही घटना घडली.