Pune: पुणेकरांना मिळणार दिलासा; लवकरच काढली जाणार देहूरोड-चांदणी चौक रस्त्याची निविदा, नितीन गडकरी यांची माहिती
Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

पुणे-मुंबई (Pune-Mumbai) महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या (Dehu Road to Chandni Chowk) बांधकामासाठी नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच या कामासाठी निविदाही काढण्यात येणार आहे. यामुळे वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे येथील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा मावळ लोकसभा मतदारसंघातून जातो. या ठिकाणी असलेल्या देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील अंडरपास आणि ओव्हर ब्रिजची उंची व रुंदी कमी आहे, त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे राष्ट्रीय महामार्गाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. या रस्त्याचा डीपीआर तयार असून लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पुणे-मुंबई महामार्गाचे देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतचे काम ‘गोल्डन क्वाड्रंट’ रस्ता बांधकाम प्रकल्पांतर्गत करण्यात आल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. हे काम पूर्ण करण्याची व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रिलायन्सकडे सोपविण्यात आली होती, मात्र ठेकेदाराने या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही.

देहूरोड आणि वाकडपर्यंतचा परिसर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येतो. वाकड ते चांदणी चौक हा परिसर पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि ओव्हरब्रिज आहेत. यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथे अनेकदा जाम होते. त्यामुळे या रस्त्याचा सुधारित डीपीआर तयार करण्यात येत होता. या कामाच्या निविदा प्रसिध्द करणे आणि कामे जलदगतीने पूर्ण करणे यावर माझा भर असेल, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले. (हेही वाचा: अपघातग्रस्त गोविंदांना भाजप आणि मनसेकडून विमा सुरक्षा कवच)

खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडेही नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग 548-डी म्हणून घोषित केला आहे. एनएचआयएने रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमीन संपादित झाली नाही. त्यामुळे हे काम 3 जुलै 2020 रोजी प्रलंबित प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले, त्यामुळे त्याचे काम थांबले आहे. चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत, त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. या महामार्गाच्या कामाची निविदाही लवकरच काढण्यात येणार आहे. मंत्री गडकरी यांनी या महामार्गाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.