Dahi Handi 2022: अपघातग्रस्त गोविंदांना भाजप आणि मनसेकडून विमा सुरक्षा कवच
Dahi Handi in Mumbai (Photo Credits: IANS)

दहीहांडी (Dahi Handi) उत्सवात अपघातग्रस्त गोविंदांना भाजप (BJP) आणि मनसेने (MNS) विमा सुरक्षा कवच पुरवले आहे. विमा इन्शुरन्स भाजप सुरक्षा कवच योजने अंतर्गत मुंबई भाजपने गोविंदा पथकांच्या मंडळांचा दहा लाखांचा विमा काढला आहे. यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच मनसेकडून चिलखत  योजनेअंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे.  दहीहांडी उत्सवात सहभागी होणारे विविध मंडळाचे गोविंदा मानवी थर लावताना जखमी होत असतात. मानवी मनोरे लावताना अपघात होऊन अनेक गोविंदा जखमी होतात. तसेच काहींच्या जिवावरही बेतू शकते.

ही बाब लक्षात घेऊन शेलार यांनी मुंबईतील 350 पथकांच्या गोविंदांचा विमा उतरवला आहे. एका गोविंदा पथकातील 50 गोविंदांचा यामध्ये समावेश आहे.  नातेवाईकांना मदत मिळावी म्हणून मनसेने गोविंदासाठी विमा सुरक्षा कवच योजना आणली आहे. या योजनेतील विम्याची मुदत 19 ऑगस्टचा पूर्ण दिवस असेल. सुरक्षा कवच योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असे आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही, असंही गजानन काळे यांनी सांगितले. यामध्ये गोविंदा जखमी झाला असेल आणि त्यास दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असतील तर दवाखान्याचा खर्च, तसेच गंभीर जखमी होऊन हात, पाय यास इजा होऊन अपंगत्व येणारे असेल तर पाच लाख रुपये आणि मृत्यू ओढावल्यास दहा लाख रुपये इतक्‍या रकमेचे विमा कवच आहे. मागील आठ वर्षांपासून मुंबई भाजपाच्या वतीने गोंविदांना विमा सुरक्षा कवच पुरवले जाते, अशी माहितीही शेलार यांनी दिली.