
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या व्यक्तीमत्वाशी असलेल्या साधर्म्याचा फायदा घेऊन सोशल मीडियावर कल्ला करणाऱ्या आणि गणपती उत्सव अथवा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून कथित रुपात बक्कळ गल्ला कमावणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विजय नंदकुमार माने (Vijay Nandkumar Mane) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मुळचा आंबेगाव येथील रहिवासी आहे. मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर या तरुणाचे छायाचित्र प्रसारित झाले होते. या छायाचित्रात हा पठ्ठ्या चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा (Impersonate Eknath Shinde) हुबेहूब दिसतो. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो तसेच, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होते, असा काहींचा आरोप आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी विजय नंदकुमार माने या व्यक्तीविरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की पुणे पोलिसांचे खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी सोमवारी सकाळी बंडगार्डन परिसरात गस्त घालत असताना त्यांना समाजमाध्यमांवर छायाचित्र पाहायला मिळाले. या छायाचित्रात मुळशीतील गुंड शरद मोहोळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधर्म्य असलेली एक व्यक्ती दिसत होती. (हेही वाचा, Shiv Sena Dasara Melava 2022: दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात? बीएमसीकडून अद्याप परवानगी नाही; पण शिवसेना निर्णयाप्रत आल्याची चर्चा)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्र पोलिसांनी बारकाईने पाहिले. त्याबाबत तपास केला असता समजले की, छायाचित्रात गुंड शरद मोहोळ याच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचे नाव विजय माने आहे. त्यानंतर माने याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडिओही प्रसारित झाला होता. या व्हिडिओत माने याच्या समोर काही महिला वेगवेगळे हावभाव करत नृत्य करत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे या व्हिडिओतही माने याची वेशभुषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी होती.दरम्यान, विजय माने हा लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करतो, असे आनेकांचा आरोप आहे. या प्रकरणात खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे तपास करत आहेत. सोशल मीडियावर मात्र माने याची चांगलीच क्रेझ असल्याचे पाहायला मिळते.