Shiv Sena Dasara Melava 2022: दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात? बीएमसीकडून अद्याप परवानगी नाही; पण शिवसेना निर्णयाप्रत आल्याची चर्चा
Uddhav Thackeray | (File Image)

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava 2022) घेण्याबाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिकेकडे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी दोन अर्ज आले आहेत. एक उद्धव ठाकरे गटाचा आणि दुसरा एकनाथ शिंदे गटाचा. महापालिकेने या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे समजते. शिवाजी पार्कवर परंपरेने दसरा मेळावा घ्यायला परवानगी नाकारली तर कोर्टात जाऊ. कोणताही निर्णय देण्यास महापालिकेने विलंब लावला अथवा निर्णयच दिला नाही तर थेट मैदानात उतरुण दसरा मेळावा घेण्याचा विचार शिवसेनेत बळावत असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे पक्षातच दोन गट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित असतानाच आता शवतीर्थ नेमके कोणाचे? याबाबत उत्सुकता कायम आहे. शिवसेना दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे पाठिमागील जवळपास अर्ध्या शतकाचे समिकरण. मात्र, आता शिवसेनेतील फाटाफुटीमुळे आणि प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे महापालिकेसमोरही निर्णय कोणाच्या बाजूने द्यायचा याबाबत संभ्रम पाहायला मिळतो आहे. अर्थात अद्याप पर्यंत तरी महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. (हेही वाचा, Raj Thackeray: राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकाऱ्यांना धक्का, पक्षाची नागपूर कार्यकारिणी बरखास्त)

दरम्यान, शिवाजी पार्कला पर्याय म्हणून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानासाठी केलेला अर्ज 'एमएमआरडीएने स्वीकारला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळाव्याबाबतचा प्रश्न निकाली निघाला आहे. शिवसेनेची मात्र मैदाना अभावी कोंडी झाली आहे.

दरम्यान, प्रथम अर्जास प्राधान्य या तत्त्वावर मुंबई महापालिकेने शिवसेनेला शिवाजी पार्कवरील मैदानासाठी परवानगी द्यावी,ही शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी पहिल्यांदा अर्ज केला असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठीचा पहिला हक्क हा प्राधन्यक्रम आणि परंपरेनेही शिवसेनेचाच आहे, अशी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनातील शिवसेनेची भूमिका आहे.