Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नागपूर दौऱ्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दणका दिला आहे. नागपूर मनसेची (Nagpur MNS) कार्यकारिणीच राज ठाकरे यांनी बरखास्त केली आहे. पक्ष स्थापनेला आज 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सोळा वर्षांमध्ये उर्वरीत महाराष्ट्रात मला पक्ष जसा दिसतो, तसा मला नागपूरमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी पुन्हा नव्याने सुरुवात केली जाईल. घटस्थापनेनंतर कोल्हापूर, कोकण दौरा होईल. त्यानंतर नागपूर मनसे कार्यकारिणी पुन्हा नव्याने जाहीर केली जाईल, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. नागपूर दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे यांनी म्हटले की, राजकारणात जे जे पक्ष पुढे येतात ते सर्वजण प्रस्थापितांविरोधात लढूनच पुढे येतात. नागपूरबाबत बोलायचे तर नागपूर हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आता या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला पाहायला मिळतो. नागपूरमध्ये मनसेला जिंकायचेतर भाजपविरोधात लढायला हवे. या वेळी त्यांनी आगामी काळात आपण थेट भाजपसोबत लढू असा इशारा दिला. तसेच, आगामी काळात भाजपशी युती करण्याच्या मनस्थितीत मनसे नसल्याचेही संकेत दिले. (हेही वाचा, Raj Thackeray Vidarbha Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून पाच दिवसांचा विदर्भ दौरा सुरु)

मनसे-भाजप युती किंवा महाविकासाघाडी सरकारबद्दल मनसेची भूमिका याबाबत प्रसारमाध्यमांतून काही बातम्या येत आहेत. या सर्व बातम्या निराधार आहेत. खरे तर या बातम्यांचा स्त्रोत मी स्वत:च शोधतो आहे, अशी मिश्कीट टिप्पणीही राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, सध्याच्या राजकारणात राजकीय टीकेपेक्षा व्यक्तीगत टिकेला फार महत्त्व दिले जात आहे. ज्यामुळे राजकारणातील आणि व्यक्तीगतही संबंध बिघडले जात आहेत, अशी नाराजीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

राजकीय पक्ष मिळुन लोकांचा विश्वासघात करत आहेत. लोक एक-एक दोन-दोन तास रांगेत उभा राहुन मतदान करतात. हे लोक आपापल्या राजकीय विचारांच्या नेत्यांना, पक्षांना मतं देतात. पण निवडून आले की, सर्वच राजकीय पक्ष भूमिका विसरतात. लोकांना गृहीत धरतात. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी पहाटे भूमिका बदलून सरकार स्थापन करतात, शपथा घेतात. आता लोकांनीच या लोकांना वटणीवर आणायला हवे,असे राज ठाकरे म्हणाले.