पुण्यात मेट्रो (Pune Metro) सेवा सुरु झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात 2024 मध्ये, 4 कोटींहून अधिक लोकांनी मेट्रो मार्ग 1 आणि 2 ने प्रवास केला आहे. दोन्ही मार्ग पुण्यात हिट ठरत असताना, रहिवासी अधिकाधिक मेट्रो मार्गांची मागणी करत आहेत. कल्याणीनगरमधील आयटी हब लाईन 2 ने जोडला आहे, अशात आता लोक हिंजवडीला शहराशी जोडणाऱ्या मेट्रोची वाट पाहत आहेत. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर, मेट्रोमुळे हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. उन्हाळ्यापर्यंत ही लाइन सुरू होईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अलीकडेच, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्याने सांगितले की, ही सेवा सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू केली जाऊ शकेल.
निवडणुकीच्या काळात घातलेले निर्बंध आणि व्हीआयपी मुव्हमेंटमुळे ब्रेक लागला असला तरी, आता मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही पुणेरी मेट्रो यंदाच्या दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगितले होते. ही 23.3 किमी लांबीची लाईन 3 केवळ दैनंदिन प्रवासच सुखकर करणार नाही, तर विकासाला चालना देईल आणि संपूर्ण शहरातील वाहतूक कोंडी कमी करेल.
पुण्यात मेट्रोची लोकप्रिया पाहता प्रशासनही अनेक मार्गांचे नियोजन करत आहे. यातील काही मार्ग पाइपलाइनमध्ये आहेत, तर अन्य मार्गांचे काम सुरू आहे. नियोजित विस्तारांमध्ये पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते वाघोली, चांदणी चौक ते वनाझ आणि खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गांचा समावेश आहे. पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज पर्यंतच्या लाईन 1 च्या विस्ताराचे काम आधीच सुरु आहे, 2025 मध्ये त्याला आणखी गती अपेक्षित आहे. स्वारगेट ते कात्रज पर्यंत पुणे मेट्रो लाईन 1 च्या विस्ताराची निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे आणि एक कंत्राटदार लवकरच नियुक्ती होईल. (हेही वाचा: Central Railway: मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर 5 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंदी; वर्ष अखेरीस गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय)
लाईन 2 साठी, रामवाडी ते वाघोली, चांदणी चौक ते वनाझ आणि खडकवासला ते खराडी या मार्गांच्या विस्तारासाठी अंतिम मंजुरी येत्या वर्षात अपेक्षित आहे, ज्यामुळे या मार्गांवरही लवकरच काम सुरू होईल. महा-मेट्रोने निगडी ते मुक्ताई चौक, वाकड, नाशिक फाटा आणि चाकणमधून जाणाऱ्या नवीन प्रस्तावित मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या, फेज 2 साठी सातपैकी चार प्रस्तावित मार्ग केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.