धक्कादायक! पुण्यात हॉटेलसमोर लघुशंका करण्याच्या वादातून दोन गटात मारामारी; तरुणाचे अपहरण करून खून
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

लघुशंकेसारख्या क्षुल्लक गोष्टीवरून पुण्यात (Pune) तरुणाचे अपहरण करून, कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये या 24 वर्षीय तरुणाचा मृत्य झाला आहे. ही गोष्ट पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) परिसरात घडली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. हितेश गोवर्धन मूलचंदानी असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी रोहित किशोर सुखेना यांनी फिर्याद दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

मंगळवारी सकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) जवळील खुल्या मैदानावर हितेशचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तपासाची सूत्रे हलली. मिळालेल्या माहितीनुसार, हितेश हा आपल्या मित्रांसह पिंपरी येथील कुणाल बार मध्ये बसला होता. या बारचा मालक कुणालचा मित्र आहे. त्यावेळी अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, अरबाज शेख, अक्षय भोसले आणि लंगडा असे त्या बार मध्ये आले. त्यावेळी अमीनने बारसमोर लघुशंका केली. तिथे असे काही करू नये असे लिहिण्यात आले होते. (हेही वाचा: हॉटेलमधील बिलाच्या वादावरुन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून केली निर्घृण ह्त्या)

या गोष्टीवरून हितेश आणि त्याचे मित्र व अमीन व त्याचे मित्र यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तसेच अमीनने हॉटेलमधील कैलास पाटील यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या भांडणात हितेशने अमीनच्या एका मित्राला पकडून ठेवले व बाकीचे पळून गेले. याच वादातून अमीन आणि त्याच्या मित्रांनी हितेशचे अपहरण करून त्याचा चाकू आणि कोयत्याने वार करत खून केला. या घटनेप्रकरणी अमीनला ताब्यात घेण्यात आले असून, चारजण फरार आहेत. पिंपरी पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.