पुण्यातील नऱ्हे परिसरातील गॅरेजला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीमध्ये गॅरेजमध्ये असलेली 10 वाहने जळून खाक झाली आहे. यामध्ये 4 चारचाकी वाहने आणि 6 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबतील अद्याप काही माहिती मिळाली नाही. (हेही वाचा - पुण्यात पाळीव कुत्र्यावर शेजारच्याकडून एअरगनने हल्ला; मालकाची पोलिस स्टेशन मध्ये धाव)
मागील काही दिवसांपासून पुणे शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी देखील शहरातील वेस्टएंड मॉलमध्ये मोठी आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मॉलमधील नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं होतं.
ही घटना ताजी असतानाच नऱ्हे परिसरात असलेल्या परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी 10 वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
कोंढवा परिसरात असलेल्या पारगे नगर येथील रस्त्यावर एमएनजीएल गॅसची पाईपलाईन फुटल्याने भीषण आग लागली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.