Pune: सिंहगड किल्ल्यावरील E-Bus Service आजपासून तात्पुरती स्थगित; 1 मेला झाले होते उद्घाटन
E Bus Service (Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

पुण्याजवळील (Pune) सिंहगड किल्ल्याकडे (Sinhagad Fort) जाणार्‍या रस्त्यातील अडथळे, किरकोळ अपघात आणि सद्य परिस्थिती लक्षात घेता किल्ल्यापर्यंतची ई-बस सेवा (E-Bus Services) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पुण्याची स्थानिक वाहतूक युटिलिटी, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने याबाबत माहिती दिली आहे. गडावर जाणाऱ्या खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याठिकाणी ई-बस सेवा सुरू करण्यात आली होती.

पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नव्याने सुरु झालेल्या ई-बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु अरुंद रस्ते, तीव्र वळणे, खडी आणि उतार यामुळे वाहनांच्या चार्जिंगवर त्याचा परिणाम होत आहे. याठिकाणी छोट्या ई-बसचा ताफा वाढवण्याची आणि चार्जिंग स्टेशन्सची गरज आहे. तसेच गडावर जाणाऱ्या रस्त्याची देखभाल व रुंदीकरणाचीही गरज आहे.

पीएमपीएमएल अधिकाऱ्याने सांगितले की, या ठिकाणी घडलेले किरकोळ अपघात, रस्त्यामधील अडथळे आणि तुलनेने लहान बसेसची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने 17 मे पासून ई-सेवा बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन मिनी बसेसचा ताफा उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू केली जाईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, ई-बसचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवताच त्यांनी तातडीने पीएमपीएमएल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धोकादायक वळणांची देखभाल व दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ही सेवा स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पुण्यात शुक्रवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. सिंहगड किल्ल्यावरून परतणारी पुणे परिवहन मंडळाची ई-बस खोल दरीत कोसळताना थोडक्यात बचावली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. आश्चर्य म्हणजे एका छोट्या भिंतीमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस सिंहगड किल्ल्यावरून उतरत होती. हा किल्ला खूप उंचावर बांधलेला आहे. शुक्रवारी दुपारी बस उतरताना घसरली आणि खड्ड्याच्या दिशेने गेली. तिथे बांधलेल्या छोट्या भिंतीला बस थडकली. सुदैवाने ही भिंत इतकी मजबूत होती की बसच्या वजनाने ती तुटली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. अशा परिस्थितीत येथे जाण्यासाठी सरकारी बस हा एकमेव मार्ग आहे. (हेही वाचा: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्ता 13 मे पासून 24 मे पर्यंत बंद; मुंबई ट्राफिक पोलिसांची माहिती)

बस अपघाताची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठ दिवसांत अशा तीन घटना घडल्या आहेत. गडावर जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभागाच्या वतीने मेरा सिंहगड, मेरा मिशन अभियानांतर्गत किल्ल्यासाठी ही ई-बस सेवा यावर्षी 1 मे पासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि पर्यटकांची संख्या पाहता वीकेंडला येथे 24 बसेस चालवल्या जातात.