पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर, बारामती, भोर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने भाजप समोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात थेट भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये लढत पाहायला मिळत आहे. पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने इथे तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment) – पुणे छावणी हा पुणे शहरातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. 2014 पासून इथे भाजपची चांगलीच ताकद वाढलेली दिसून येते. हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र भाजपचे सध्या इथे 5 नगरसेवक आहेत. महायुतीने यावेळी सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून रमेश बागवे तर मनसेकडून मनीषा सरोदे रिंगणात उभे आहेत. या मतदार संघात सर्वाधिक म्हणजे 28 उमेदवार रिंगणात उभे आहेत.

पुरंदर (Purandar) – महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी पुरंदर हा एक ओळखला जातो. इथे भाजपचे विजय शिवतरे तर कॉंग्रेसचे संजय जगताप यांचे वैर गेले अनेक वर्ष आहे. यंदा विजय शिवतरे हे शिवसेनेकडून तर पुन्हा एकदा संजय जगताप कॉंग्रेसकडून उभे आहेत. तर मनसेकडून उमेश जगताप या दोघांना काट्याची टक्कर देणार आहेत.

बारामती (Baramati) – पवार कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून या बारामती मतदारसंघाकडे पहिले जाते. मात्र पवार कुटुंबाला इथून नक्की कोण टक्कर देणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. राष्ट्रवादीकडून पवार घराण्यातून अजित पवार उभे आहेत. तर त्यांना युतीकडून भाजपचे गोपीचंद पडळकर टक्कर देणार आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघ हा 1957 च्या निवडणुकीवेळी अस्तित्वात आला. 2014 सालीदेखील अजित अनंतराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले होते. त्यावेळी ते 1,50, 588 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब गावडे उभे होते.

भोर (Bhor) – भोर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता इथे एकून 7 उमेदवार रिंगणात उभे आहेत. शिवसेनेकडून कुलदीप कोंडे, कॉंग्रेसकडून संग्राम थोपटे तर मनसेकडून अनिल मातेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागच्या वर्षीदेखील इथे कुलदीप कोंडे आणि संग्राम थोपटे यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. 2014 साली संग्राम थोपटे यांनी 78, 602 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे कुलदिप कोंडे उभे होते.

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.