
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची भेट घेतली. यावेळी पुणेसंदर्भातील अनेक रेल्वे प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली. पुणे रेल्वे सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे पुण्यातील रेल्वे व्यवस्थेला नवीन गती मिळत आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे, आणि या रेल्वे सुधारणांमुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढेल, व्यापारी आणि व्यावसायिक प्रवासाला चालना मिळेल, यामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना फायदा होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
अश्विनी वैष्णव यांच्या भेटीबाबत मोहोळ यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे. याबाबत मोहोळ म्हणाले, ‘पुणे लोकसभा मतदारसंघ आणि परिसरातील विविध विषयांसंदर्भात आज केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री मा.श्री. अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. पुणे रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण, पुणे-दिल्ली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेन, पुणे-नाशिक हायस्पीड ट्रेन, पुणे-जोधपुर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढविणे आणि पुणे आकाशवाणीच्या विविध प्रश्नांसंदर्भात यावेळी विस्तृत चर्चा केली.’
:
📍नवी दिल्ली
पुणे लोकसभा मतदारसंघ आणि परिसरातील विविध विषयांसंदर्भात आज केंद्रीय रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री मा.श्री. अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.
पुणे रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण, पुणे-दिल्ली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेन, पुणे-नाशिक… pic.twitter.com/Y1St2teEgs
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 3, 2025
पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. ही रेल्वे मूळतः संगमनेरमधून जाण्याची योजना होती, परंतु मार्गात अचानक बदल केल्याने स्थानिक आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. सुरुवातीला ही हाय-स्पीड ट्रेन संगमनेर मार्गे धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती, परंतु केंद्र सरकारने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ही ट्रेन पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक मार्गे धावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण येथील रहिवाशांनी तीव्र निषेध केला असून, रेल्वेने मूळ संगमनेर मार्गाचा अवलंब करावा अशी अनेकांची मागणी आहे.
दुसरीकडे, पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाचाही कायापालट होत आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या नूतनीकरणात जानेवारी 2025 पर्यंत दोन नवीन लिफ्ट्स कार्यान्वित झाल्या आहेत, तर जुलै 2025 पर्यंत आणखी दोन लिफ्ट्स सुरू होतील. याशिवाय, प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे, आधुनिक सुविधा जसे की वाय-फाय, स्वच्छता केंद्रे आणि प्रतीक्षालय यांचा समावेश आहे. हे बदल प्रवाशांचा अनुभव सुधारतील आणि स्थानकाची क्षमता वाढवतील. (हेही वाचा: Shivajinagar-Hinjawadi Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम 90 टक्के पूर्ण)
देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन लाँच होण्यास सज्ज आहे. ही नवीन ट्रेन देशातील रेल्वे वाहतुकीत आणखी क्रांती घडवून आणेल. बीईएमएलने डिझाइन केलेली वंदे भारत स्लीपर ट्रेन केवळ दिसायला सुंदरच नाही, तर त्यात अद्भुत कार्यक्षमता आणि उत्कृष्टता देखील असेल. आता वंदे स्लीपर ट्रेन ही महाराष्ट्र आणि दिल्लीला जोडेल. ही नवीन अत्याधुनिक ट्रेन पुणे आणि दिल्ली दरम्यान धावण्याची शक्यता आहे. याआधी वंदे भारत एक्सप्रेसच्या व्हर्च्युअल लाँचिंगप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, पुणे विभागाला ही ट्रेन देण्यासाठी आम्ही रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहोत.