Share Market Fraud Pune: बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेट प्रकरण, पुणे पोलिसांकडून 5 जणांना अटक; आरोपांचे धागेदोरे हाँकाँगपर्यंत
Stock Market Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Stock Market Fraud Pune: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात सुरु असलेल्या मोठ्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. हे एक फेक शेअर मार्केट रॅकेट (Stock Market Fraud) होते. ज्याचा पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Cell) पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. जुनेद मुख्तार कुरेशी, सलमान मन्सूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, आरिफ अन्वर खान आणि तौफिक गफ्फार शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे रॅकेट पाठिमागील काही दिवसांपासून शहर परिसरात सक्रीय होते. आरोपींनी अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे.

शहरातील नागरिकांची फसवणूक

गुन्हे शाखेचे डीसीपी संदीप डोईफोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात एक बनावट शेअर मार्केट रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेक नागरिकांनी या रॅकेटबद्दल तक्रार केली होती. तसेच, आरोपींनी दाखवलेल्या भरघोस परताव्याच्या आमिशाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली होती. ज्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारीही दाखल केल्या होत्या. शहरातील नागरिकांनी केलेल्या या प्रकरणाशी संबंधीत विविध तक्रारींनुसार आतापर्यंत नागरिकांनी सर्व मिळून जवळपास 31 लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे. (हेही वाचा, Indian Stock Markets Shut Today: देशभरात Eid al-Fitr Celebration; भारतीय शेअर बाजार राहणार बंद)

आंतरराष्ट्रीय रॅकेट, पैशांचे रुपांत क्रिप्टोकरन्सीमध्ये

एकाच शहरातील परिसरातून एकाच विषयावर प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. फसव्या शेअर ट्रेडिंग ऍप्लिकेशनशी संबंधित पाच संशयितांना यशस्वीरित्या शोधून काढले आणि त्यांना पकडले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 7 लाखांची रोकड, 7 मोबाईल फोन, कॅश मोजण्याचे यंत्र, विविध बँकांचे 8 डेबिट कार्ड आणि विविध बँकांचे 12 चेकबुक असा मुद्देमाल आरोपींसग घटनास्थळावरुन पकडण्यात आला, अशी माहिती डीएसपी संदीप डोईफोडे यांनी दिली. (हेही वाचा, SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)

पोलिसांनी पुढे सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की पाचही आरोपींनी सुमारे 120 बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची असंख्य व्यक्तींची फसवणूक केली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील होते. कारण त्यांनी परदेशातील व्यक्तींकडून निधी प्राप्त केला. त्यांचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले आणि ते त्यांच्या हाँगकाँग येथील हँडलरकडे हस्तांतरित केले. वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे खुलासा केला की, आरोपी, जे बेरोजगार होते, त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींना टार्गेट केले. ते या व्यक्तींना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडायचे आणि परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूक करण्याची विनंती करायचे. मात्र, त्यांनी काही काळानंतर, आरोपींनी ठेवीदारांशी संवाद बंद केला आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.