Pune: कोरेगाव भीमा येथे अनेकांना Covid-19 ची लागण; लाखो लोकांनी स्मारकाला दिली भेट
Koregaon Bhima (Photo Credits-Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या काळात लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले जात आहे, परंतु अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघनही केले जात आहे. आता महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) स्मारकात पोहोचलेल्या हजारो लोकांपैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे 5,765 लोकांची चाचणी घेण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी जिल्ह्यातील जयस्तंभ लष्करी स्मारकाला भेट दिलेल्या लोकांपैकी 5 हजारहून अधिक लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. यापिकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

कोरेगाव भीमा युद्धाच्या 204 व्या वर्धापन दिनानिमित्त लाखो लोकांनी स्मारकावर आदरांजली वाहिली. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, ‘पार्किंग परिसरात थर्मल स्क्रीनिंग सुविधा होती जिथे लोकांची COVID-19 लक्षणे तपासण्यात आली आणि काहींची अँटीजेन किटद्वारे चाचणी केली गेली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 5,765 चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी पाच लोक पॉझिटिव्ह आढळले.’

पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 5 जणांपैकी 2 जण नाशिकचे आहेत. प्रसाद म्हणाले, ‘आम्ही त्यांना नाशिकला परत पाठवले आहे आणि तेथील जिल्हा प्रशासनालाही कळवले आहे. उर्वरित तीन जण पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी एक एकटा राहतो म्हणून त्याला होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले, तर इतर दोघांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवले गेले आहे. पाचही रुग्ण बहुतेक लक्षणे नसलेले आहेत आणि त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. (हेही वाचा: वैष्णोदेवी देवी मंदिर चेंगराचेंगरी प्रकारणी चौकशी समितीची स्थापना)

वैद्यकीय प्रशासनाच्या 300 हून अधिक लोकांनी  संध्याकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी सुमारे सहा लाख लोकांची तपासणी केली आहे. प्रसाद म्हणाले की प्रशासनाने आवाहन केले होते की, ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी या कार्यक्रमात भाग घेऊ नये. परंतु बरेच लोक त्यांच्या कुटुंबासह आले होते आणि यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही सहभाग होता. मास्क न घातलेल्या काही लोकांना मोफत मास्क देण्यात आले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 81,000 हून अधिक मास्क वितरित केले गेले. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही.