पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून आता निवडणूक कधी लागणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच अजित पवार यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने आता निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे लोकसभेसाठी तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच EVM देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान "पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे,अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी" असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना भावी खासदार अशा शुभेच्छा देणारे पोस्टर्स पुण्यातील चौकात झळकले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांनीदेखील संधी दिल्यास ही जागा चांगल्या तयारीने लढवेन, असं सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आजही त्यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.