काल नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एसटीचा अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एसटी बसला अपघात (ST Accident) झाला आहे. कल्याणवरुन भीमाशंकरच्या (Bhimashankar) दिशेने ही एसटी बस जात होती. एसटी बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे. (हेही वाचा - Mumbai Local Train Update: बोरिवली स्टेशनच्या ट्रॅकवर 'पॉइंट फेल्युअर'मुळे पश्चिम मार्गावरील सेवा विस्कळीत, ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी)
पाहा ट्विट -
भीमाशंकर कडून कल्याणकडे जाणाऱ्या एसटी बसला गिरवली (ता. आंबेगाव) गावाजवळ अपघात झाला. या बसमध्ये 35 प्रवासी व दोन कर्मचारी होते. अपघातातील किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करून त्यांना सुरक्षित घरी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी तीन जखमी प्रवाशांवर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक… pic.twitter.com/DXG5g7WUrE
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) July 13, 2023
कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली. गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस 20 फूट खोल ओढ्यात कोसळली. या बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते त्यामधले दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यामध्ये काल एसटीला भीषण अपघात झाला होता. सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील (Nashik Bus Accident) दरीत कोसळली. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता.