
पुण्यातील (Pune) जिल्हा ग्रामीण पोलिसांनी काही दिवसापूर्वी शिरूर येथे झालेल्या बँक दरोड्या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी तीनजण गुन्हेगार आहेत. 21 ऑक्टोबर रोजी शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या (Bank Of Maharashtra) पिंपरखेड शाखेत 2.8 कोटी रुपयांचा दरोडा घातला गेला होता. अटक केलेल्या आरोपीकडून 2.2 कोटी रुपयांच्या मालमत्तेची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये 18 लाख रुपये रोख आणि 7.3 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये खेडचा किंगपिन डॉलर उर्फ प्रवीण ओव्हाळ (29), चा जुन्नरचा अंकुर पाबळे (24), अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे धोंडिबा जाधव (29), आदिनाथ पठारे (25) आणि शिरूरचा विकास गुंजाळ (28) यांचा समावेश आहे. ही टोळी 20 ऑक्टोबर रोजी दरोडा टाकणार होती. परंतु ग्रामसभेच्या बैठकीमुळे त्यांनी हा प्लॅन पुढे ढकलला, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
पिस्तुलांसह सशस्त्र असलेल्या टोळीने 21 ऑक्टोबर रोजी बँकेत घुसून व्यवस्थापक आणि रोखपाल यांना धमकावून 2.8 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या होत्या. लुटमार करून पळून जाण्यासाठी त्यांनी सेडान कारचा वापर केला होता आणि नंतर ते दुसऱ्या गाडीत गेले. (ICICI Bank Robbery: विरार येथे आयसीआयसीआय बँकेवर दरोडा, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; माजी कर्मचाऱ्यास अटक)
स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची 10 पथके तपासासाठी नेमण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. "आमच्या टीमने अहमदनगर एमआयडीसीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासून कारचा माग काढला. आरोपी ओव्हाळ हा मध्य प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा आमची टीम तिथे पोहोचली तेव्हा त्यांना कळले की ओव्हाळ हा अहमदनगर येथे लपून बसला आहे. आम्ही सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने दरोड्यात आपला सहभाग कबूल केला आणि त्याच्या चार साथीदारांची नावेही उघड केली. या चारही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे." असे देशमुख म्हणाले.