गेले एक वर्ष संपूर्ण भारत कोरोना विषाणू (Coronavirus) साथीशी लढत आहे. आता देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर 7 लाख 84 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, मंगळवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे.
राज्यात 3 हजार 135 शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली. केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ‘कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट’ (NEGVAC) स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. लसीकरणासाठी प्राधान्यक्रमाने गट ठरविण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. (हेही वाचा: पुणे येथील सीरम इंस्टिट्युट मधून कोविशिल्ड लस आज देशातील 13 ठिकाणी पोहचवली जाणार)
फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे. एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 1200 व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे.