Court hammer (Representative Image)

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने चर्चेत आलेल्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज कोरटकरला जामीन मंजूर केला आहे.

इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती त्यानंतर प्रशांत कोरटकरला 24 मार्चला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी तो महिनाभर फरार होता.

30 मार्चला कोल्हापूर सहदिवाणी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला जामीन फेटाळल्यानंतर त्याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. प्रशांत कोरटकर पुराव्यांशी छेडछाड करु शकतो. त्यामुळे त्याला सखोल तपासापर्यंत जामीन मिळू नये, असा युक्तिवाद वकील असीम सरोदे यांनी केला होता. Attack on Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर कोर्ट परिसरात हल्ला; पोलिसांकडून एकजण ताब्यात.   

नेमकं काय घडलं होतं?

इंद्रजीत सावंत यांनी 'छावा' या चित्रपटावर टीका केली होती आणि असा युक्तिवाद केला होता की हा चित्रपट इतिहासाचे विकृत रूप सादर करतआहे. त्यांनी असा दावा केला होता की या चित्रपटात महाराणी सोयराबाईंना खलनायक म्हणून चुकीचे दाखवले आहे.  तर खरा खलनायक अण्णाजी दत्तो होता. पाँडिचेरीचे माजी फ्रेंच गव्हर्नर फ्रँकोइस मार्टिन यांच्या समकालीन लेखनाचा हवाला देत सावंत यांनी आरोप केला की ब्राह्मण कारकूनांनी संभाजी महाराजांच्या ठावठिकाण्याबद्दल मुघलांना माहिती दिली होती, ज्यामुळे त्यांना पकडण्यात आले. चुकीची माहिती रोखण्यासाठी विकिपीडियावरून चुकीची ऐतिहासिक माहिती काढून टाकण्याची मागणीही सावंत यांनी केली आहे.