Prashant Koratkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात (Kolhapur Sessions Court) हल्ला करण्यात आला आहे. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंर त्यास मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसांनी संपूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र, कथितरित्या एका वकीलाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यास चोप देण्याचा प्रयत्न केला. अर्थात, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कथीत वकिलास बाजूला करुन ताब्यात घेतले आणि पुढील अनर्थ टळला.

कोरटकर याच्यावर गंभीर आरोप

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची कथीत बदनामी आणि इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांना धमकी दिल्याचा प्रशांत कोरटकर याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्याची चौकशी सुरु असून त्यास कोठडी संपल्यामुळे कार्टात आणण्यात आले होते. दरम्यान, हल्ला करणारा व्यक्ती वकील असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले आहे. पोलीस बंदोबस्तात कोरटकरला बाहेर काढले जात असताना कोर्ट आवारातच या व्यक्तीने 'आमच्या महाराजांची बदनामी करतोस काय' असे म्हणत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर मागच्या दाराने कोर्टात हजर, कोल्हापूरकरांनी दाखवलं पायतान)

आरोपीच्या कोठडीत वाढ

प्रशांत कोरटकर यास तेलंगणा येथून ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली आणि त्यास कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोल्हापूर पोलिसांनी त्यास राजवाडा कोर्टात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मूदत आज संपल्याने त्यास पुन्हा कोर्टासमोर हजर केले असता, पोलिसांना त्याची आणखी दोन दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली. त्यामुळे पुढचे आणखी दोन दिवस तो पोलीस कोठडीत राहणार हे निश्चित झाले आहे. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यांततर कोर्टाने निर्णय दिला. कोरटकर याच्या वतीने अॅड. सतीश घाग हे बाजू मांडत आहेत. तर, अॅड असिम सरोदे हे इंद्रजित सावंत यांच्या वतीने खटला लढवत आहेत. दरम्यान, या सुनावणीस सरोदे हे ऑनलाईन पद्धतीने हजर होते तर, कोरटकरचे वकील प्रत्यक्ष हजर होते.  (हेही वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल विधान करणार्‍यांना जरब बसवण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शाहांची भेट; 10 वर्षांची शिक्षा, अजामिनपात्र विशेष कायदा करण्याची मागणी)

पोलिसांची विनंती कोर्टाकडून मान्य

प्रशांत कोरटकर याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा 30 मार्च रोजी कोर्टासमोर हजर केले जाईल. दरम्यान, कोरटकर याने त्याच्यावरील अनेक आरोपांची कबुली दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दुसऱ्या बाजूला गुन्हा दाखल झाल्यापासून प्रदीर्घ काळ कोरटकर कोठे लपला होता. त्याला या काळात कोणाकोणाची मदत झाली, त्यासाठी त्याला रोख किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे कोणी पूरवले याबाबत आणखी तपास करायचा असल्याचे कारण देत, पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. जी कोर्टाने मान्य केली आहे.