
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajeet Sawant) यांना धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) यास कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) आज (25 मार्च) कोल्हापूर कोर्टात हजर केले. कोरटकर याने केलेल्या वक्तव्यामुळे पाठिमागील एक महिन्यांपासून समाजमनात संताप आहे. हाच संताप पोलीस त्यास शहरातील राजवाडा कोर्टात घेऊन जात असताना उफाळून आला. कोल्हापूरकर नागरिकांनी त्यास पायताण दाखवले. या वेळी कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणावर कोर्टाबाहेर जमले होते. जमावाचा एकूण नूर पाहून संभाव्य अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यास मागच्या दाराने कोर्टात हजर केले आहे. इंद्रजित सावंत यांच्या बाजूने वकील असीम सरोदे बाजू मांडत आहेत. तर कोरटकरच्या वतीने अॅड. सतीश घाग हे युक्तीवाद करत आहेत. दोन्ही वकिलांचा युक्तीवाद कोर्टात सुरु झाला आहे.
भाजपचा धक्कादायक आरोप
प्रशांत कोरटकर यास अखेर एक महिन्यांनी तेलंगना येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक झाली असली तरी, राजकारण जोरात तापले आहे. सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे अंगुलीनिर्देश करत कोरटकर हा कुठे लपून बसला होता आणि त्यास कोण मदत करत होते हे आता पुढे आले आहे, असे म्हटले. तर, कोरटकर यास पळून जाण्यास काँग्रेस नेतेच मदत करत होते, तो तेलंगना येथील काँग्रेस नेत्याच्या घरात लपून बसला होता, असा धक्कादायक आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. या आरोपस काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (हेही वाचा, Prashant Koratkar Arrested: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या फरार प्रशांत कोरटकर ला तेलंगणा मधून अटक - रिपोर्ट्स)
हे भाजपचंच पाप- वडेट्टीवार
भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेल्या आरोपास काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रशांत कोरटकर आणि काँग्रेस यांचा काहीही संबध नाही. खरे तर कोरटकर हे भाजपचेच पाप आहे. सत्ताधारी आणि पोलिसांच्या आशीर्वादानेच तो बुरखा घालून वावरत होता. चंद्रपूरात जाऊन पोलिसांनी त्याची भेट घेतली. खरे तर या कोरटकरला देशद्रोही म्हणून घोषीत करायला हवे. पण, भाजप आपले पाप लपविण्यासाठी ते काँग्रेसचं नाव घेत आहेत. आम्ही तेलंगणातील काँग्रेस नेते आणि मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांचा आणि कोरटकरचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, प्रशांत कोरटकर याचा समाचार घेण्याच्या इराद्याने कोल्हापूरकर राजवाडा कोर्ट परिसरात जमले होते. मात्र, प्रसंगावधान आणि नागरिकांमध्ये असलेली जनभावना विचारात घेता पोलिसांनी वेळीच सुरक्षीत पावले उचलली आणि कोरटकर यास मागच्या दरवाजाने कोर्टात हजर केले.