Pothole (संग्रहित संपादित प्रतिमा)

Potholes on Highways: ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम तातडीने पूर्ण करुन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाशिक–भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका. पीक अवरमध्ये अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी. अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्किंग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामार्ग दुरूस्ती कामाची उद्या पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक-भिवंडी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे वाहतुकीसाठी अडचणी होत आहेत. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी, अपघात होत आहेत. याची मुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

ठाणे ते नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवसरात्र एक करून खड्डे बुजवावेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. खड्डे बुजवताना रॅपिड क्विक सेटींग हार्डनर, एम सिक्टी या साहित्याच्या वापर करावा. तात्काळ खड्डे बुजविल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai-Goa Highway Update: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील; डिसेंबरपर्यंत चौपदरीकरणाचं काम पूर्ण होईल; नितीन गडकरी यांची माहिती)

ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रिकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यंत्रणांनी समन्वयातून काम करावीत. दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव याठिकाणी पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतूक बंद करण्याबाबत एकत्रित अधिसूचना कोकण विभागीय आयुक्तांनी काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. खड्डे भरणे, नाल्यांची दुरुस्ती करणे आदीसह आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात, या कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.