पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. महाविकासागाडी सरकारसाठी हे प्रकरण अत्यंत अडचणीचे ठरले आहे. मंत्री राठोड यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आली नाही. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री, शिवसेना ( Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पक्षा पदाधिकारी आणि मंत्र्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला संजय राठोड हे उपस्थित नसल्याचे समजते आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक सुरु आहे. या बैठकीस पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्ह्यातील सर्व संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आयोजित केली जाणारी ही पहिलीच इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि पॉवरफूल बैठक मानली जात आहे. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांतून वृत्त, शिवसेना खासदार राऊत म्हणाले 'मला कल्पना नाही')
या बैठकीत पक्षविस्तार आणि आगामी निवडणुका याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे समजते. असे असले तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्यासोबत वनमंत्री राठोड यांचा असलेला कथीत संबंध याबाबत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेच्या गोटातून पूष्टी होऊ शकली नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यासमोर विचारले असता राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याबाबत मला कल्पना नाही असे म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी मात्र सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.