Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांतून वृत्त, शिवसेना खासदार राऊत म्हणाले 'मला कल्पना नाही'
Sanjay Rathore, Pooja Chavan Suicide Case (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) चर्चेत असलेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत (leader Sanjay Rathore resign) शिवसेनेच्या गोटातून पूष्टी होऊ शकली नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यासमोर विचारले असता राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याबाबत मला कल्पना नाही असे म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी मात्र सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

टीव्ही 9 या खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, वनमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान मातोश्रीकडे पाठवला आहे. दरम्यान, कथीत राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी काय निर्णय घेतला याबाबत माहिती समजू शकली नाही.

दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला किंवा नाही याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, राजकीय वर्तुळातून मात्र जोरदार प्रतिक्रिया येताना दिसत आहे. विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा असे म्हटले आहे. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: आमची बदनामी त्वरित थांबवा, नाहीतर मी आत्महत्या करेन, पूजाच्या वडिलांनी मिडियासमोर दिली प्रतिक्रिया)

प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. कारण एकाने 'मारल्यासारख करायचं, दुसऱ्याने रडल्यासारख करायचं' असं होता कामा नये. तसेच राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी'.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके तैनाद केली असून ती राज्याच्या विविध भागात जाऊन तपास करत आहेत. प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.