Police Recruitment: महाराष्ट्रात लवकरच 7200 पदांची पोलीस भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

राज्यात पोलीस भरतीसाठी (Police Recruitment in Maharashtra ) प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच 7,200 पदांसाठी पोलीस भरती (Police Recruitment) केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी याबाबत माहिती दिली. दिली वळसे पाटील हे अहमदनगर दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी अहमदनगर पोलिसांच्या (Ahmednagar Police) कामाचा आढावा घेतला. या वेळी प्रसारमाध्यमांनी पोलीस भरतीविषयी प्रश्न विचारला असता उत्तरादाखल ते बोलत होते.

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 5,200 पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती लवकरात पूर्ण केली जाईल. ही भरती पूर्ण होताच पुढच्या 7,200 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. दिलीप वळसे पाटील यांच्या माहितीमुळे राज्यभरातील अनेक तरुणांच्या आशा बळावल्या असून, सरकारी नोकरीचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, 5,200 पदांसाठी सुरु असलेल्या पोलीस भरतीसाठी . लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी झाली आहे. आता केवळ अंतीम यादी जाहीर करण्याचे काम सुरु आहे. ही भरती पूर्ण होताच पुढच्या भरतीसाठीही राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या भरतीची प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्या भरतीसाठी सुरुवात होणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले. (हेही वाचा, Police Recruitment: महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदं भरणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती)

राज्यातील तरुणांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील तरुणांच्या हाताला काम दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेकारी कमी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. देशभरातील तरुणांमध्ये सध्या बेरोजगारी आणि महागायी या विषयांवरुन मोठा असंतोष आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच सावध झाले असून भरती प्रक्रिया सुरु केली आहे.