मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या अधिकाऱ्यांविरुद्धही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर कलम 409, 420, 465, 466, 471 आणि 120 बी अंतर्गत नोंदविण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईओडब्ल्यूने एक विशेष तपास पथक (STI) देखील स्थापन केले. पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.
एएनआय ट्विट -
Mumbai Police: Economic Offences Wing (EOW) filed FIR against HDIL, and Punjab & Maharashtra Cooperative (PMC) Bank officials u/s 409, 420, 465, 466, 471 and 120B in PMC bank fraud case. EOW has formed a Special Investigation Team (SIT) to probe the matter. pic.twitter.com/4na4QzirrF
— ANI (@ANI) September 30, 2019
बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये आहेत. एचडीआयएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवाण यांचेही नाव एफआयआरमध्ये नमूद केले आहे. तक्रारीनुसार बँक अधिकाऱ्यांनी 2008 ते 2019 दरम्यान बँकिंग नियमांचे उल्लंघन केले आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक अधिसूचना जारी करून पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेत कर्जाच्या रकमेत अनियमितता असल्याचे सांगितले होते. यामुळेच आरबीआयने जय भगवान भोरिया यांना पीएमसी बँकेचा प्रशासक म्हणून नेमले. (हेही वाचा: PMC बॅंक खातेदारांना RBI ची दिलासादायक बातमी; प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा आता कमाल 10,000 रूपये!)
आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार केवळ 10,000 रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत. अशा सर्व गोष्टींचा त्रास खातेदारांना होत आहे, त्यासाठी पीएमसी बँकेने ग्राहकांच्या तक्रारी व निवारणासाठी एक टोल फ्री क्रमांक जाहीर केला. ठेवीदार कोणत्याही तक्रारीच्या निवारणासाठी www.pmcbank.com वेबसाइटला भेट देऊ शकतात. चौकशीसाठी टोल फ्री नंबर 1800223993 वर कॉल करु शकतात.