PMC Bank Crisis: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक (PMC) वर पुढील 6 महिन्यांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) आर्थिक निर्बंध घातले होते. आज तीन दिवसांनंतर आरबीआयने खातेदारांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. आता पीएमसी खातेदार दिवसाला खात्यातून 10,000 रूपये काढू शकणार आहेत. यापूर्वी बॅंकेने खातेदारांना केवळ 1000 रूपयांची रक्कम काढण्याची मुभा दिली होती. 23 सप्टेंबरला आरबीआयने पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातल्यानंतर खातेदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मुंबई: HDIL मालकाच्या घरासमोर PMC बॅंक कर्मचार्यांची आंदोलनं.
Banking Regulation Act, 1949 च्या अंतर्गत आरबीआयने तीन दिवसांपूर्वी पीएमसी बॅंकेवर कारवाई केली होती. त्यानंतर मुंबईतील अनेक बॅंकांसमोर लांबच लांब रांग लागली होती. आता पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याने सुमारे 60% खातेदार त्यांच्या अकाऊंटमधील सारी रक्कम काढू शकणार आहेत. आज पीएमसी बॅंक कर्मचार्यांनी HDIL ग्रुपच्या मालकाच्या घरासमोर बसून आंदोलन केले आहे. तसेच PMC बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) जॉय थॉमस यांनादेखील पदावरून हटवण्यात आलं आहे.
RBI बॅंकेचे ट्वीट
Directions under Section 35A of the Banking Regulation Act, 1949 (AACS) – Punjab and Maharashtra Cooperative Bank Limited, Mumbai, Maharashtra - Relaxation in withdrawal limit of Deposit Accountshttps://t.co/oYdCAl1BVB
— ReserveBankOfIndia (@RBI) September 26, 2019
पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच सोसायटींचे देखील कोट्यावधीचा फंड अडकून पडल्याने अनेक नेहमीचे व्यवहार कसे पूर्ण करायचे हा यक्षप्रश्न खातेदारांसमोर होता.