Pm Modi In Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पांढरकवडा (Pandharwada) येथील सभेत पाणी न मिळाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. क्षितीजा गुटेवार (Kshitija Gutewar) (वय 12 वर्षे) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. क्षितीजाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत क्षितीजाला वेळेवर पाणीही मिळाले नाही. तिची प्रकृती खालावली. त्यामुळेच क्षितीजाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ' आता दोष तरी कुणाला द्यावा', असा उद्विग्न सवाल क्षितीजाचे मामा विनोद पेंटावार यांनी विचारला आहे. दरम्यान, क्षितीजा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे वैद्यकीय कारण अद्याप समजू शकले नाही.
सभेला महिलांची मोठी गर्दी
प्राप्त माहितीनुसार, क्षितीजा गुटेवार ही विद्यार्थीनी जिल्हा परिषद विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दिवशी त्यांनी पांढरकवडा येथे स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या महामेळाव्याला उपस्थिती लावली. इथे मोदींची सभाही झाली. या सभेसाटी शिवाजी वॉर्डातील काही महिला रिक्षाने गेल्या होत्या. या महिला सभेला उपस्थित राहण्यासाठी सकाळीच घरातून निघाल्या होत्या. या महिलांसोबत क्षितीजा हीसुद्धा तिची आई आणि सात वर्षाचा भाऊ कृष्णा यांच्यासोबत गेली होती.
सभास्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांचे हाल
पंतप्रधान मोदींची सभा सकाळी 11 वाजता सुरु होणार होती. त्यामुळे सभेच्या वेळेपूर्वीच अनेक महिलांनी सभास्थळी हजेरी लावली होती. दरम्यान, त्या दिवशी उनही खूप होते. त्यामुळे उपस्थित महिलांची पाणी आणि उकाड्याने घालमेल चालली होती. सभास्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने महिलांचे हाल होत होते. दरम्यान, सुरक्षेच्या कारणावरुन तेथील पोलीसांनी महिलांना हालण्यासही मनाई केली. उलट जागीच बसून राहा, असे पोलीसांकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे उपस्थित महिलांच्या त्रासात आणखीच भर पडली.
पाणी वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही
दरम्यान, क्षितीजा हिलाही प्रचंड तहान लागली. पाण्यासाठी ती कासावीस झाली. परंतू, तिला पाणी वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी तीची प्रकृती खालावली. काही काळाने तिला पांढरकवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाण्याअभावी क्षितीजाचे अवयव निकामी
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, क्षितीजाच्या कुटुंबीयांना नागपूर येथील डॉक्टरांनी सांगितले की, पाण्याअभावी मुलीची प्रकृती खालावली आणि तिचे अवयव निकामी झाले. दरम्यान, उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, पांढरकवडा:'गो बॅक मोदी ' यवतमाळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झळकले बॅनर)
वडीलांचे कर्करोगाने चार वर्षांपूर्वी निधन
प्राप्त माहितीनुसार, क्षितीजा ही मुळची नांदेड जिल्ह्यातील आहे. पांढरकवडा हे तिचे आजोळ आहे. तिच्या वडीलांचे कर्करोगाने चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर क्षितीजाची आई तिला आणि भाऊ कृष्णा याला घेऊन पांढरकवडा येथे माहेरी आली. वेळेत पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. आता यात नेमका दोष कुणाला द्यायचा? असा उद्विग्न सवाल क्षितीजा हिचे मामा मामा विनोद पेंटावार यांनी विचारला आहे.