देशात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) एका कोरोना रुग्णावर करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या यशानंतर खासगी रुग्णालयांमध्येही प्लाझ्मा थेरपीची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी आयसीएमआर संस्था प्रयत्न करत आहे.
10 आणि 11 मे रोजी एका करोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यात आले होते. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मोहोळ यांनी याबद्दल रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन केलं. (हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारचं बारा बलुतेदार आणि श्रमिकांसाठीचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल - हसन मुश्रीफ)
ससून हॉस्पिटल पुणे मध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी. कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी यशस्वी.
The Plasma Therapy conducted on Covid19 patient at Sasoon Hospital Pune is successful.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 21, 2020
पुणे जिल्हा प्रशासनाने प्लाझ्मा थेरपीची करोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीला आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) परवानगी दिली होती. त्यानुसार, आता लवकरचं इतर खाजगी रुग्णालयामध्येदेखील प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येणार आहेत. यापूर्वी नायर रुग्णालयात दोन रुग्णांनावर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांमध्ये सुधारणा झाली आहे.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
एखाद्या विषाणूवर जेव्हा लस किंवा औषध सापडत नसतं तेव्हा तातडीचा उपाय म्हणून प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जातो. एखाद्या विषाणूचा संसर्ग झालेली व्यक्ती जेव्हा त्या आजारातून बरी होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात त्या विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. बरे झालेल्या धडधाकट व्यक्तींच्या शरीरातील रक्तातून प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने अँटीबॉडी मिळवल्या जातात. या अँटीबॉडीज ज्या रुग्णाला गरज आहे, अशा रुग्णाच्या शरीरातील रक्तात सोडल्या जातात. या अँटीबॉडीज त्या रुग्णाच्या रक्तात मिसळून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बरी होते.