Patoda Gram Panchayat: भास्कर पेरे पाटील यांची मुलीच्या पराभवार प्रतिक्रिया, दिले इंदिरा गांधी यांचेही उदारहण
Bhaskarrao Pere Patil | (File Photo)

भास्करराव पेरे पाटील (Bhaskarrao Pere Patil) यांची कन्या अनुराधा पेरे पाटील (Anuradha Pere Patil) यांचा पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत (Patoda Gram Panchayat Election) पराभव झाला. पाटोदा ग्रामपंचायत ((Patoda Gram Panchayat) निवडणुकीत पेरे पाटील यांचा आणि त्यांच्या पॅनलचा पराभव झाल्याची चर्चा प्रसारमाध्यमांतून रंगली. पराभवाच्या या चर्चेवर भास्करराव पेरे पाटील यांनी दिलखूलास प्रतिक्रिया दिली. आता या प्रतिक्रियेवरुनही गावकरी आणि विविध पातळीवर अर्थ काढले जातील कदाचित. काय म्हणाले भास्करराव पेरे पाटील.

पाटोदा आणि पेरे पाटील यांची इतकी चर्चा का?

जवळपास गेली सुमारे 20 वर्षे पाटोदा गावात ग्रामपंचायत निवडणूक लागली नव्हती. या गावात प्रदीर्घ काळ भास्करराव पेरे पाटील हेच सरपंच राहिले आहेत. अत्यंत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी गावचा विकास केला. गावाला आदर्श गावाच्या रांगेत आणून बसवले. त्यांच्या या प्रयोगाची राज्य आणि देशभर दखल घेतली गेली. त्यामुळे भास्करराव पेरे पाटील जोरदार चर्चेत राहिले.सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतूनही पेरे पाटील यांच्या भाषणाची पेरणी जोरदार असते. त्यामुळे भास्करराव पेरे पाटील यांच्या नावाची नेहमीच चर्चा राहिली आहे. या वेळी ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये पहिल्यांदाच पेरे पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. ते निवडणुक या प्रक्रियेपासून दूर झाले. मात्र, त्यांच्या कन्या आणि इतर समर्थक मंडळींनी निवडणूकीत सहभाग घेतला. या सर्व प्रक्रियेमुळे चर्चा झाली नसती तरच नवल. (हेही वाचा, Patoda Gram Panchayat: भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव; पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल)

मुलीच्या पराभवावर काय म्हणाले पेरे पाटील?

कन्या अनुराधा पेरे पाटील यांच्या पराभवाबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता भस्करराव म्हणाले, 'पहिल्यांदा भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्येचा पराभव म्हणने बंद करा. तिच्याकडे माझी मुलगी म्हणून बघू नका. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये झालेल्या निवडणुकीतील ती एक उमेदवार होती. उमेदवार कोणीही असू शकते. त्यामुळे ती निवडणुकीला उमेदवार म्हणून सामोरी गेली. भास्करराव पेरे पाटील यांची कन्या म्हणून नव्हे. जनमताने कौल दिला त्यात तिचा पराभव झाला इतकाच त्याचा अर्थ आहे.'

लोकांची समज कमी, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता

'पराभवाचेच म्हणाल तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. मीसुद्धा पहिल्यांदा निवडणूक लढलो तेव्हा पराभूत झालो होतो. त्यामुळे लोकशाहीत जय पराभव याकडे अधिक वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही. खरं तर आपल्याकडे लोकांची समज कमी आहे. पद आणि निवडणुकीतून आपण बाहेर पडलो आहोत हे आपण आधीच जाहीर केले होते. निवडणूक आणि प्रचार सुरु होता तेव्हा मी कर्नाटकमध्ये होतो. आपल्याकडे लोकांची समज कमी आहे. त्यामुळे लोक पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाला, पेरे पाटील यांचे वर्चस्व संपले असे म्हणतात. गाव आपले आहे. माझे आहे. गावातील सरवच जण आपले आणि माझे आहेत. त्यांमुळे माझ्या मुलीचा पराभव झाला असला तरी तिच्या विरोधात निवडून आलेलाही माझ्याच गावचा आहे. अवघ्या 10-12 मतांनी तिचा पराभव झाला. लोकशाहीत असेच घडते. त्यातून तिला शिकायला मिळेल', असेही भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या मुलीच्या पराभवाची समिक्षा करताना प्रतिक्रिया दिली.

गावच्या विकासासाठी सल्ला देणार

दरम्यान, आपण आपले स्वतंत्र कार्यालय स्थापन केले आहे. त्या ठिकाणी आपण गावच्या विकासासाठी जो कोणी येईल त्याला सल्ला देण्याचे काम करणार आहे. गावकरी आले किंवा राज्यातील कोणताही व्यक्ती गावच्या विकासासाठी सल्ला मागायला आला तर आपण त्याला तो देणार आहोत. त्यासाठीच आपण आपले कार्यालय स्थापन केल्याचेही भास्करराव पेरे पाटील म्हणाले.

पाटोदा ग्रामपंचायतीसाठी एकूण 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 08 उमेदवार आगोदरच बिनविरोध निवडून आले होते. केवळ 3 जागांसाठी निवडणूक पार पडली. या अनुसाधा पेरे पाटील या त्या तीनपैकीच एक उमेदवार होत्या. या निवडणुकीत अनुराधा यांना 186 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी 204 मतं मिळाली.