पुण्यातील पानशेत धरण प्रलयाला 58 वर्षे पूर्ण; क्षणार्धात नष्ट झाला होता पेशवेकालीन पुण्याचा रुबाब, आजही जखमा आहेत ताज्या
पानशेत धारण फुटले (संग्रहित-संपादित प्रतिमा)

‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुळशीबागेपासून ते हिंजवडीपर्यंत, मृत्युंजयापासून के.पी.पर्यंत पुण्यातील प्रत्येक भागाने स्वतःची खासियत निर्माण केली आहे. मात्र आज जितके कठीण, कणखर, स्वावलंबी पुणे आपणाला दिसत आहे त्यामागे फार मोठे आघात, अनेक त्याग आहेत. त्यातीलच एक म्हणजे पानशेत धरण फुटल्यावर झालेली पुण्याची अवस्था. ज्या घटनेने पुण्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला आज या घटनेला 58 वर्षे पूर्ण झाली आहेत. चला पाहूया नक्की काय होती ती घटना.

12 जुलै 1961 ची भयानक काळरात्र. जणू आकाश फुटून पुणे आणि परिसरावर मुसळासारखे कोसळत होते. त्या रात्री कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की पुण्यावर आणि पुण्यातील 70 हजार कुटुंबांवर ही भयानक काळरात्र येऊन कोसळणार आहे. पानशेत भरले होते ते कधीही फुटू शकते अशा बातम्या आधीच वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत मातीची पोती टाकून ते अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर या पोत्यांमुळे रात्रभर कसे तरी तग धरलेल्या धरणाचा पहाटे बांध फुटला आणि शहरात पाणीच पाणी झाले.

क्षणार्धात बंड गार्डनचा पूल सोडला तर बाकी सगळे पूल पाण्याखाली गेले. शनिवार पेठ, नारायणपेठ, कसबा पेठ, सोमवार पेठ, डेक्कन परिसर तर संपूर्ण पाण्याखाली होता. लोकांनी चक्क पर्वतीवर आश्रय घेतला. त्याकाळी पुणे आजच्या इतके पसरले नव्हते, जवळजवळ सर्व पुणे पाण्याखाली गेल्याने पुण्याचा संपर्कच तुटला. या घटनेमुळे पुण्यात तब्बल एक महिना, वीस दिवस वीजपुरवठा नव्हता अणि किमान एक महिना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. (हेही वाचा: पुण्यावर झालेले आघात; आजही ताज्या आहेत त्या जखमा, ज्याने शहराचा चेहरामोहराच बदलला)

शेकडो घरे वाहून गेली होती. त्यामुळे नवीन पुणे वसवण्याची गरज होती. या घटनेनंतर त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तडक निर्णय घेतला की, पुण्यालगत असलेल्या जागा ताबडतोब पूरग्रस्तांना द्याव्यात. आज बहरलेले कोथरूड, सहकारनगर आणि बाणेरपर्यंत जी वस्ती दिसत आहे, त्या जागांचे वाटप 1962 पर्यंत पूर्ण झाले होते. एकेकाळी इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा मोठ्या तोऱ्याने मिरवणारे पेशवेकालीन पुणे नष्ट होऊन, आधुनिक पुण्याची निर्मिती पानशेतच्या दुर्दैवी आपत्तीनेच झाली.

या घटनेला आज 58 वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही या दुर्दैवी अपघाताच्या खुणांचे घाव कित्येक पुणेकरांच्या मनावर ताजे आहेत.