महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून (Pandharpur Vitthal Temple) एक अनोखा प्रकार समोर आला आहे. आमलकी एकादशीनिमित्त (Amalaka Ekadashi) पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात द्राक्षे आणि फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीसाठी साधारण 1 टन द्राक्षांचा वापर करण्यात आला होता. परंतु अवघ्या काही वेळातच ही एक टन द्राक्षे अचानक गायब झाली. हा प्रकार भाविकांच्या लक्षात येताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
माहितीनुसार, आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला द्राक्ष आणि फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. पुणे आणि बारामतीच्या भाविकांकडून ही आरास केली होती. गाभारा सजवण्यासाठी एक टन द्राक्षे वापरण्यात आली. परंतु सजावटीसाठी लावलेली सर्व द्राक्षे अवघ्या अर्ध्या तासात गायब झाली आहेत. 3 मार्च रोजी श्रृंगारानंतर सहा वाजता भाविकांच्या दर्शनाला सुरू झाली, त्यानंतर अर्ध्या तासात एक द्राक्षही तिथे दिसले नाही. मंदिराच्या पुजाऱ्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाविकांचा या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाहीये.
याबाबत भक्त सांगतात, एक टन द्राक्षे अचानक गायब झाली असे कसे होऊ शकते? मंदिरातून द्राक्षे गायब झाल्याची चर्चा गावभर सुरु झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचू लागले आहेत. पंढरपुरातील नागरिक या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. घडल्या प्रकाराबाबत भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मंदिर प्रशासनाने अशा कृत्यांमध्ये कोणाचा हात आहे, याचा तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी विठ्ठल भक्तांनी केली आहे, जेणेकरून हा प्रकार पुन्हा घडू नये. (हेही वाचा: मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत Vada Pav चा समावेश)
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरला हंगामी फळे आणि फुलांनी सजवण्यात आले होते. महाराष्ट्रातील लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाच्या सजावटीसाठी भाविक सेवा देत आहेत. शुक्रवारी फाल्गुन शुध्द म्हणजे अमलकी एकादशीला अवलाची एकादशीही म्हणतात. विठ्ठलाच्या भक्तांमध्ये निसर्गाविषयी आदर वाढावा यासाठी वारकरी संप्रदायात ही एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी एक हजार किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला होता. ही द्राक्षे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे.