प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबई (Mumbai) आणि वडापाव (Vada Pav) यांचे एक खास नाते आहे. शहरात अगदी तीनही वेळी वडापाव खाणाऱ्या शौकिनांची संख्या प्रचंड आहे. मुंबईबाहेरील व्यक्ती मुंबईमध्ये आल्यावर हमखास वडापाव खातो. हळू हळू इथला वडापाव राज्यासह देशभरात लोकप्रिय होऊ लागला आहे. आता या वडापाव संदर्भात मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे.

जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी TasteAtlas नावाचे एक प्रायोगिक प्रवास मार्गदर्शक (Experiential Travel Guide) आहे, जे अस्सल जुन्या पाककृती, खाद्य समीक्षक पुनरावलोकने आणि लोकप्रिय पदार्थ व पदार्थांबद्दल संशोधन लेख एकत्र करते. आता TasteAtlas ने 'जगातील सर्वोत्तम 50 सँडविच'च्या यादीमध्ये वडापावला स्थान दिले आहे. या यादीमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्रातील वडापाव चक्क 13व्या क्रमांकावर आहे, जे एक उत्तम जागतिक रँकिंग आहे.

या यादीमध्ये तुर्कीचा टॉम्बिक प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील पेरूचा बुटीफारा आणि तिसरा क्रमांक अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमोला मिळाला आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविचचा समावेश आहे. ज्यातील एक आहे अवाकाडो टोस्ट आणि दुसरा म्हणजे वडापाव. (हेही वाचा: Mumbai Local: धक्कादायक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, धावत्या लोकलमधील लगेज बोगीत मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू)

वडापाव हा मॅश केलेले बटाटे वापरून बनवला जातो. बटाट्यामध्ये मसाले, मीठ, मिरची घालून तो चण्याच्या पिठात बुडवून तळतात. मुंबईमध्ये वडापाव लसणाची लाल कोरडी चटणी, कांदा, लिंबू, तळलेली मिर्ची अशा गोष्टींसोबत सर्व्ह केला जातो. दरम्यान, साधारण 1960 आणि 1970 च्या दशकात दादर स्टेशनजवळ काम करणार्‍या अशोक वैद्य नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्यापासून वडापाव या आयकॉनिक स्ट्रीट फूडची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी भुकेल्या कामगारांना तृप्त करण्यासाठी पोर्टेबल, परवडणारी आणि तयार करण्यास सोपी डिश उपलब्ध करून देण्याचा विचार केला. याच विचारातून वडापावचा जन्म झाला. आता हा वडापाव जगभरात नाव कमावत आहे.