Palghar: नौसैनिक मृत्यू प्रकरणात पालघर पोलिसांचा मोठा खुलासा -'खोटी असू शकते अपहरण आणि खुनाची कहाणी'
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) येथे 26 वर्षीय नौदल अधिकारी सूरजकुमार दुबे (Surajkumar Dubey) याचे अपहरण आणि हत्या झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्यासाठी 10 पथके तैनात केली होती. झारखंडच्या रांची येथे राहणाऱ्या सूरजच्या सुटकेच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची खंडणी मागितली होती. आता पालघर पोलिसांनी सुरजचे अपहरण आणि 'खून' प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी असा दावा केला आहे की, आतापर्यंतच्या तपासात सुरजचे अपहरण झाल्यानंतर त्याला जिवंत जाळण्याचा दावा खोटा ठरला आहे.

एसपी शिंदे यांनी सांगितले की, सूरजकुमार दुबे यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज असून ते त्याची परतफेड करू शकले नाहीत. म्हणून त्याने स्वत: च्या अपहरणाचा आणि खून करण्याच्या प्रयत्नाचा कट रचला. मात्र यामध्ये तो इतका जळाला की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेन्नई आणि तलासरी भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज शोधले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरज एकटाच फिरताना दिसत आहे. एका सीसीटीव्हीमध्ये तो महाराष्ट्रातील तलासरी येथील पेट्रोल पंपावरुन 300 रुपयांचा ड्रम खरेदी करुन, त्यात पेट्रोल घेतानाही दिसत आहे.

5 फेब्रुवारीला मुंबईजवळील पालघरमध्ये एका व्यक्ती अत्यंत जळलेल्या अवस्थेत आढळली होती. लोकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले. जखमी अवस्थेतेतील ही व्यक्ती सूरज दुबे असल्याचे उघडकीस आले. सूरजने पोलिसांना सांगितले की, 30 जानेवारी रोजी त्याचे चेन्नई विमानतळावरून कोणीतरी अपहरण केले आणि त्याला रस्ता मार्गाने पालघर येथे आणले. अपहरणकर्त्यांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे दहा लाखांची खंडणी मागितली होती, असेही सूरजने पोलिसांना सांगितले. (हेही वाचा: Ravi Pujari in Mumbai Police Custody: रवी पुजारी याचा ताबा मुंबई पोलिसांकडे, अनेक गुन्ह्यांची होणार उकल)

त्यानंतर सूरजचे निधन झाले. पालघर पोलिसांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि संपूर्ण तपास केला. आता, चौकशीदरम्यान सूरजने आपल्या अपहरणाची खोटी कहाणी रचल्याचे समजले आहे. दत्तात्रेय शिंदे यांनी असेही सांगितले की, 'सुरजने 9 लाख रुपयांचे कर्ज घेतले ज्यामधील शेअर्समध्ये 5 लाख रुपये गुंतवले गेले आणि 4 लाख इतर कामांमध्ये खर्च झाले. आम्ही क्रेडिट स्कोअर एजन्सीकडे चौकशी केली आहे. आम्ही 13 बँकांकडे घेतलेल्या कर्जाबद्दल चौकशी केली आहे. खंडणीसाठी अपहरण करण्याचा हा प्रकार नाही. पुढील तपास सुरू आहे. आत्महत्या आणि अपहरण यासह इतर सर्व शक्यताबाबत पोलिस तपास करत आहेत.’