शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

विधानसभेत सर्वात जास्त आमदार निवडून आणणारे तीनही मोठे पक्ष सत्ता स्थापन करण्यास अयशस्वी ठरल्याने, आता महाराष्ट्रात राष्ट्रापती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर आज संध्याकाळी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी भाजपचे वागणे हे संतापजनक असल्याचे सांगत, सरकार बनवण्याचा आमचा दावा आजही कायम आहे, लवकरच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.

काल संध्याकाळी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आल्यावर राज्यातील राजकीय वारे बदलले. आज राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे बडे नेते मुंबईमध्ये दाखल झाले होते. मात्र अजूनही दोन्ही पक्षांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लवकरच शिवसेनेशी बोलून याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. काल राष्ट्रवादी-कॉंग्रेसचा पर्याय खुला झाला आहे. त्यामुळे तीनही पक्षांना चर्चा करण्यासाठी वेळ हवा आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, 'हिंदुत्व ही शिवसेना आणि भाजपची विचारधारा आहे. मला राममंदिर हवे होते, कारण रामाचे राज्य इथे स्थापन करायचे होते. मात्र भाजपने बहुमत मिळाल्यावर आपले वचन पाळले नाही. ते स्वतः खोटे बोलले आणि मला खोटे पाडले हे माझ्यासाठी संताजनक आहे. आता भाजप माझ्या संपर्कात आहे मात्र प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नव्या मुद्यांवर प्रस्ताव येत असेल तर, त्याला काय अर्थ आहे.' याचवेळी त्यांनी राज्यपालांच्या निर्णयावरही उपहासात्मक टीका केली. (हेही वाचा: राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू; राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी)

दुसरीकडे दोन वेगळ्या विचारधारा असणारे पक्ष कसे एकत्र येतील याबाबत विचार व्यक्त करताना उद्धवजी म्हणाले, 'देशात अनेकवेळा दोन वेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आले आहे व त्यांनी योग्य सरकार स्थापन केले आहे. याबाबत मी माहिती मागवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस हातमिळवणी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.' मात्र या पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्न विचारण्यात आला, या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी सहा महिन्यांचा अवधी दिला आहे त्यामुळे चर्चेला वेळ  आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.