मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बळीराजा बाबतीत एक महत्त्वाची घोषणा केली. ज्यात त्यांनी शेतक-यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा केली. आता काही स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत असून विरोधकांनी मात्र या घोषणेवर सडकून टिका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नाहीत,” असे सांगत सरकारवर आगपाखड केली आहे. कर्जमाफीची ही घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवत सभात्याग केला.
“आता तातडीची मदत देण्याची आवश्यकता होती. दीड लाख ते दोन लाखात फक्त 8 लाख शेतकरी येतात. असेही ते म्हणाले.” “कर्जमाफी जाहीर करताना त्याची काहीही माहिती दिली नाही. 2 लाख रुपयात कर्जमाफीत सातबारा कोरा होत नाही. त्यामुळे ठाकरे सराकारच्या कर्जमाफीत स्पष्टता नाही. कर्जमाफीत नेमका फायदा किती याबाबतही शेतकऱ्यांना संभ्रम आहे,” असेही फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतकर्यांसाठी कर्जमाफीची घोषणा; 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत 2 लाखांपर्यंत मिळणार फायदा
त्याचबरोबर “उद्धव ठाकरेंनी विदर्भाकरिता कोणतीही नवीन घोषणा केली नाही. विदर्भात पहिले अधिवेशन झाले. त्यांच्याकरिता कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यामुळे विदर्भाची निराशा झाली. अशीही टीका करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही भ्रमनिरास झाला असेल असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.