Navi Mumbai News Today: घराघरात गणपती, सोसायटी सोसायटीत गणपती, रस्त्यारस्त्यांवर गणपती. इतकेच काय नजर टाकावे तिथे गणपती. या गणपतींसाठी मग मंडळे. त्या मंडळांना राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था यांचा पाठिंबा. त्यांना दादा, भाऊ, तात्या, अण्णा, सोम्या, गोम्या यांचा असलेला वरदहस्त. त्यातून उडणारे राजकीय खटके, राजकारण, स्पर्धा, वर्गणी, खंडणी, मग निर्माण होणारे वाद आणि त्यातून परस्परांविरोधात दाखल होणाऱ्या तक्रारी, गुन्हे आणि पोलिसांकडून केली जाणारी कारवाई. त्यात अनेकांची वाया जाणारी भविष्ये. हे चित्र आजकाल अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातूनच मग पुढे आली 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना. त्याला आता काही वर्षे लोटली. पण त्यातील काही गावेच हा उपक्रम राबवताना दिसता. ही काहाणी आहे अशाच एका गावाची. ते गाव म्हणजे पनवेल (Panvel News) तालुक्यातील मोहा. (Moho Village News)
फारशी दाटीवाटीची लोकवस्ती नसलेले पण परंपरेने चर्चेत आलेले गाव म्हणजे मोहा. पनवेल तालुक्यातील अवघ्या काही लोकवस्तीचे हे गाव. पण या गावात 1954 म्हणजे तब्बल 70 वर्षांपासून 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गावकऱ्यांनी लोकमान्य टिळक यांनी दिलेला एकात्मकतेचा संदेश प्रमाण माणून ही परंपरा सुरु केली. गावातील समविचारी लोकांनी एकत्र येत 1954 मध्ये 'एक गाव एक गणपती' स्थापन केला. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. पैसा, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरणाचा अपव्यय टाळण्यासाठी गावकऱ्यांनी हा उपक्रम कायम ठेवल्याचे, गावच्या गणेशोत्सवाचे आयोजक सुरेश कडव यांनी सांगितले. विशेष म्हणजे गावच्या नव्या उमेदीच्या तरुण पिढीकडूनही या परंपरेला प्रोत्साहन आणि सक्रीय पाठिंबा मोळतो आहे, असेही ते सांगतात.
जवळपास 400 उंबरा असलेल्या या गावात सामाजिक समता आणि शांततेबद्दलही विशेष उपक्रम राबवला जातो. गावामध्ये ग्रामपंतायत निवडणुकीमध्ये ते गावकरी म्हणून एकमेकांविरोधात लढत नाहीत. तर, ते परस्पर संमतीतून सर्वानुमते उमेदवार निवडतात. उमेदवार निवडताना मात्र, एक काळजी घेतली जाते. ती म्हणजे उमेदवार जागरुक असायला पाहिजे. गावाप्रती त्याच्या मनात विविध संकल्पना असायला पाहिजेत. सन 2008 मध्ये गावामध्ये निवडणुकीत भांडण-तंटा झाला होता. त्यातून हिंसाचाराऱ्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होते.
गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात गावातील प्रत्येक कुटुंब 300 ते 400 रुपये खर्च करते. ज्यामध्ये गावातील आणि काही बाहेरील समूहांकडून भक्तीगिते गायली जातात. गणपतीपुढे गायली जाणारी ही भक्तीगिते साधारण 24 तास सुरु असतात. हे गायन आलटून पालटून असते. खासियत अशी की, या काळात एकदाही संगित वाद्य थांबले जात नाही. या काळात गणेशपूजेसाठी जवळपास 40 लोक गुंतलेले असतात. गणेशिवसर्जनादिवशी महाप्रसाद ठेवला जातो. त्यानंतर या उत्सवाची सांगता होते.