Covid-19: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; धारावीत मागील 7 दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. मुंबईत धारावी, माहीम आणि दादर परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. मात्र, धारावीत (Dharavi) गेल्या 7 दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. धारावी (7 जून) आतापर्यंत एकूण 1 हजार 912 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 71 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रादर्भाव वाढू नये, म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत.

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- दिलासादायक! मागील 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवा Coronavirus रुग्ण नाही, मात्र एकाचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे.