Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे भारतातील प्रमाण कमी आले असले तरी ओमिक्रॉन व्हेरीएंटने पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) असलेला कोरानाचा एकही रुग्ण आतापर्यंत आढळला नाही. परंतू, दक्षिण अफ्रिका आणि जोखीम अधिक असलेल्या देशांतून भारतात आलेल्या सहा प्रवासी कोरोना व्हायरस संक्रमित आढलले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सहाही प्रवासी महाराष्ट्रात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार ते कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका (BMC), मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात आहेत. या सहा जणांना दक्षिण अप्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरीएंटची बाधा झाली आहे किंवा नाही याबाबत निश्चित स्पष्टता अद्याप होऊ शकली नाही. या सर्वांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, जोखीम असलेल्या देशांतून आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि विमानतळ प्राधिकरणाकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल. या प्रवाशांची स्वतंत्रपणे चाचणी करुन त्यांना 2, 4 आणि 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल. तसेच, त्यांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येईल असे राज्य सरकारने म्हटले आहे.

नायजेरीरियातून आलेले दोघे जण पुणे जिल्ह्यातील पिपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत आले आहेत. या दोघांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करुण आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. प्रामुख्याने युरोप आणि ओमायक्रॉन व्हेरीएंटचा प्रभाव असलेल्या अफ्रिकन देशांतून आलेल्या प्रवाशांची प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. तसेच, त्या सर्वांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत. च्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग आढळून आला नाही तरी, त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. (हेही वाचा, Mahaparinirvan Diwas 2021: महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

दरम्यान, अफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेल्या कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे येथे आलेल्या सर्व प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. ओमक्रॉन हा स्ट्रेन कोविडच्या इतर सर्व स्ट्रेनपेक्षा सर्वाधिक धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अभ्यासक आणि तज्ञ अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगतात.

.