राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी, अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरुळ, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा आणि उस्मानाबाद पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे केतकी चितळे हिला अटक झाली असून येत्या 18 मेपर्यत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यासाठी सोमवारी पोलिसांनी केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथील घरी आणले. तिच्याकडून तिचा फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. चितळे सध्या 18 मेपर्यंत ठाणे पोलिसांच्या कोठडीत असून, चौकशीसाठी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल झालेल्या अन्य 15 पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.
केतकीला ठाणे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केले. अधिक तपासासाठी पोलिसांनी तिची कोठडी मागितली. केतकीने वकिल घेण्यास नकार देत स्वतः न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. चितळेने शेअर केलेली पोस्ट अन्य कोणीतरी लिहिली होती. या पोस्टमध्ये फक्त पवार आडनाव आणि वय 80 असा उल्लेख आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो 81 वर्षांचे आहेत. या पोस्टमध्ये ‘नरक वाट पाहत आहे’ आणि ‘तुम्ही ब्राह्मणांचा तिरस्कार करत आहात’ अशी वाक्ये होती. (हेही वाचा: टीव्ही अभिनेत्रीच्या आईला सायकल धडकली, नऊ वर्षांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल)
केतकीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ‘केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे.