Bicycle | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई येथील गोरेगाव येथील वनराई पोलिसांनी (Mumbai Police) नऊ वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकल चालवतानाृ टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवा (Simran Sachdeva) हिच्या आईला धडक देऊन जखमी केल्याचा आरोप या मुलावर आहे. बालकल्याण समितीने म्हटले आहे की, पोलिसांना अल्पवयीन मुलावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. दरम्यान, अभिनेत्रीने म्हटले आहे की, मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याबात आपण पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या प्रकरणास तितके महत्त्वच दिले नाही.

कथित अपघात 27 मार्च रोजी गोरेगाव पूर्वेतील नेस्कोच्या शेजारी लोढा फिओरेन्झा येथे घडला. सचदेवाची 62 वर्षीय आई संध्याकाळी फिरायला निघाली होती. या वेळी सायकल चालवणाऱ्या मुलाने तिला जोरात धडक दिली. ज्यामुळे ती खाली पडली. सचदेवा म्हणाली की, तिच्या आईच्या खुब्याचे हाड निखळल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता ती काहीशी बरी आहे.

मुलाची चुकी असताना त्याच्या पालकांनी तिच्या आईची साधी विचारपूसही केली नाही. त्यातून त्यांचा उद्धटपणाच दिसून येतो. केवळ त्यामुळेच आपण पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे अभिनेत्री सचदेवा हिने म्हटले आहे. सचदेवाने छोटी सरदारनी, नागिन 3 आणि सुपरकॉप्स Vs सुपरव्हिलेन्स सारख्या टीव्ही कार्यक्रमात काम केले आहे.

आपण दाखल केलेल्या तक्रारीबाबत सचदेवा हिने म्हटले आहे की, “होय, मी गुन्हा दाखल केला आहे पण मला मुलावर नव्हे तर पालकांवर गुन्हा दाखल करायचा होता. माझी आई गेल्या 1.5 महिन्यांपासून पूर्णपणे अंथरुणावर आहे. या घटनेनंतर मुलाच्या आईने व्हॉट्सअॅपवर फक्त सॉरी असा मेसेज पाठवला पण ती कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. माझ्या आईची तब्येत तपासण्यासाठी ती माझ्या घरीही गेली नाही. सर्व ज्येष्ठ नागरिक चालत असलेल्या ठिकाणी तिने आपल्या मुलाला सायकल का चालवायला दिली असे मी तिला विचारले असता, तिच्याकडे काहीच उत्तर नव्हते, असेही ती म्हणाले. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.