कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) यंदा सर्वच सण-उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरे होत आहे. महाराष्ट्रातही यंदा दिवाळी (Diwali 2020) निमित्त काही उपयोजना राबवण्यात आल्या होत्या. यामध्ये मुंबईत फटाके वाजवण्यावर निर्बंध होते. आता एका स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पहिल्या दिवशी शनिवारी, मुंबईत ध्वनिप्रदूषणाची (Noise Pollution) सर्वात कमी पातळी नोंदविण्यात आली. आवाज फाऊंडेशनच्या (Awaaz Foundation) संस्थापक सुमैरा अब्दुलाली यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, मुंबईमध्ये झालेल्या कमी डेसिबल पातळीच्या नोंदीचे श्रेय राज्य सरकारला जाते. राज्य सरकारने फटाके फोडण्याचे निर्बंध व त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली, यामुळेच हे घडले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शहरात फटाके फोडणे आणि फटाक्यांच्या वापरावर काही निर्बंध घातले होते. यावर्षी दिवाळीदरम्यान ध्वनी प्रदूषणाची झालेली नोंद ही गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी आहे, असे अब्दुलाली म्हणाल्या. एनजीओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ध्वनी पातळी रात्री 8 ते रात्री 10 पर्यंत (शनिवारी) आणि त्यानंतर दुसर्या दिवशी (रविवारी) सकाळ पर्यंत मोजली गेली.
शहरातील शिवाजी पार्क मैदानावर रात्री 10 च्या पूर्वीची ध्वनी पातळी 105.5 डेसिबल नोंदविण्यात आली. 2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कला सायलेन्स झोन घोषित केल्या नंतर, यंदा दिवाळीच्या वेळी पहिल्यांदाच येथे फटाके फोडण्यात आले होते. 2019 मध्ये 112.3 डीबी, 2018 मध्ये 114.1 डीबी आणि 2017 मध्ये 117.8 डीबी अशी सर्वाधिक आवाज पातळी (मुंबईसाठी) नोंदवली गेली आहे. (हेही वाचा: तब्बल 8 महिन्यांनतर कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बातमी; महाराष्ट्रात आज 2,544 रुग्णांची नोंद)
बीएमसीने शहरातील काही ठिकाणी रात्री दहा नंतर फटाके फोडण्यास बंदी घातली होती. परंतु काही ठिकाणी याचे उल्लंघन झाले. असे असूनही लोकांनी कमी फटाके किंवा हिरव्या फटाक्यांचा वापर केल्याने मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी फटाक्यांचा एकूण वापर लक्षणीय प्रमाणात कमी होता.