Maharashtra Board Exam 2021: दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच यासंदर्भात मी कोणतही वक्तव्य केलेलं नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आवश्यक आहे. सध्या माध्यमांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांविषयी प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलं आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकराने राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्षा गायकवाड यांनी वर्तवल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलं होतं. मात्र, आज वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. (वाचा - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने 1 मार्च पासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा; वर्षा गायकवाड यांचे निर्देश)
यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेता येणार नाहीत. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनचं घ्याव्या लागतील. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने भविष्यात कोणता निर्णय घ्यावा लागेल, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची बातमी चुकीची आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतला. सर्व यंत्रणेने अधिक सतर्क राहून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनासमवेत समन्वय साधून निर्णय घेण्याचे निर्देशदेखील गायकवाड यांनी यावेळी दिले. वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.